कंपन्यांकडून नाशिककरांची फसवणूक : 'नेटवर्क' हवाय, मग बाल्कनीत बसा किंवा टेरेसवर जा...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 02:14 PM2019-02-07T14:14:08+5:302019-02-07T14:19:10+5:30
मोबाईल नेटवर्क पुरविणाऱ्या नामांकित कंपन्यांकडून ‘४जी’च्या नावाखाली नाशिककरांची एकप्रकारे लूट केली जात आहे. ग्राहकांना जलद इंटरनेट वापरण्यासाठी घरामधून दारात किंवा अंगणात बसण्याची वेळ येत आहे.
नाशिक : सर्वोत्कृष्ट, सर्वोत्तम, सुपरफास्ट इंटरनेट, नेटवर्क अशी जाहितरात करत मोबाईल नेटवर्क पुरविणाऱ्या नामांकित कंपन्यांकडून ‘४जी’च्या नावाखाली नाशिककरांची एकप्रकारे लूट केली जात आहे. ग्राहकांना जलद इंटरनेट वापरण्यासाठी घरामधून दारात किंवा अंगणात बसण्याची वेळ येत आहे. महापालिकेच्या हद्दीतील काही उपनगरांमध्ये तर घरात प्रवेश करताच मोबाईलचे नेटवर्क सिग्नल गायब होत असल्याचा अनुभव येत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शहरात हजारो लोक स्मार्टफोनचा वापर करु लागले आहे. प्रत्येक व्यक्ती अधिक दिवसांचा कालावधी मिळविण्यासाठी किमान पाचशे रुपयांचा इंटरनेटचा रिचार्ज करतो. ५०० रुपयांमध्ये दररोज एक किंवा दीड जीबी डेटा वापराची परवानगी देत एकूण ८४ ते ९० दिवसांचा कालावधी कंपन्यांकडून दिला जातो; मात्र या कालावधीत ग्राहकांना डेटाचा स्पीड मिळविताना दमछाक करावी लागत आहे. रात्रीच्यावेळी काही भागांमध्ये तर सिग्नल येत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. अशोका मार्ग सारख्या परिसरात सोसायट्यांमध्ये प्रवेश करताच मोबाईलची ‘रेंज’ गायब होते. तसेच शरणपूररोड, गंगापूररोड, डिसूजा कॉलनी, इंदिरानगर, गोविंदनगर, सिडको, उपनगर आदि भागांमध्ये ‘इनडोअर’ मोबाईलची रेंज उपलब्ध होत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
नाशिक महापालिका क्षेत्रात २० किलोमीटरच्या परिसरात मोबाईल नेटवर्कची बोंबाबोंब असल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. शहरात मोबाईल नेटवर्कची अशी अवस्था असेल तर ग्रामिण भागात ‘कनेक्टिवीटी’ची काय अवस्था असेल? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मोबाईल कंपन्यांकडून नेटवर्क टॉवरच्या फ्रेक्वेन्सीची अवस्था तपासून त्यामध्ये योग्य ती तांत्रिक दुरूस्ती करण्याची मागणी होत आहे. डेटाचा स्पिड मिळत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. ग्राहक तक्रार निवारणासाठी वारंवार कंपनीच्या ग्राहक सेवा अधिका-यांशी संपर्क साधूनदेखील उपयोग होत नसल्याचे नागरिकांनी सांगितले
‘०.१४केबी’चा वेग
इंटरनेटची ४जी सेटींग्ज केल्यानंतर ‘०.१४ ते ०.८३केबी’चास्पीड मिळत असल्याने नेटवर्कची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. नेटवर्कमध्ये सुधारणा करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.