शहरातील आठ अनधिकृत शाळांना नाेटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2022 01:44 AM2022-06-15T01:44:52+5:302022-06-15T01:45:12+5:30
शहरातील ८ अनधिकृत शाळा त्वरित बंद करण्याची नोटीस महापालिकेच्या शिक्षण विभागाने बजावल्या आहेत. अन्यथा प्रत्येक दिवसाला १० हजार रुपये दंड याप्रमाणे कारवाई करण्याचा इशारा मनपा प्रशासनाधिकारी सुनीता धनगर यांनी दिला आहे.
नाशिक : शहरातील ८ अनधिकृत शाळा त्वरित बंद करण्याची नोटीस महापालिकेच्या शिक्षण विभागाने बजावल्या आहेत. अन्यथा प्रत्येक दिवसाला १० हजार रुपये दंड याप्रमाणे कारवाई करण्याचा इशारा मनपा प्रशासनाधिकारी सुनीता धनगर यांनी दिला आहे.
शासनाच्या आरटीई २००९ नुसार परवानगीशिवाय शाळा सुरू करता येत नाही. मात्र, तरीही नियम डावलून नाशिक शहरात ८ शाळा बेकायदेशीररीत्या सुरू आहेत. त्यामुळे या शाळा तत्काळ बंद करण्यात याव्यात आणि त्या बंद केल्याचा अहवाल मनपा शिक्षण विभागाच्या कार्यालयात सादर करावा, असे शिक्षणाधिकाऱ्यांनी नोटिसीत नमूद केले आहे. येत्या सात दिवसांत बंद न केल्यास नियमानुसार एक लाख रुपये दंड त्याचप्रमाणे शाळा सुरू ठेवल्यास प्रत्येक दिवसासाठी १० हजार रुपये दंड या प्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
महापालिकेने ज्या शाळांना नोटिसा बजावल्या त्यात खैरुल बन्नत इंग्लिश मिडीयम स्कूल, जयदीप नगर, नाशिक, गॅलेक्सी इंग्लिश मिडियम, टाकळी राेड, विबग्याेर राईस स्कूल, समर्थनगर, विजय प्राथमिक स्कूल, रायगड चाैक, दि बुद्धीष्ट इंटरनॅशनल स्कूल ना. राेड, वडाळा व पाथर्डी या तीन अशा एकूण आठ शाळांना नाेटीस पाठविण्यात आली आहे.