‘निसर्ग’ कोपला : वादळी वाऱ्याने शहरात १९० वृक्ष उन्मळून पडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 02:16 PM2020-06-04T14:16:02+5:302020-06-04T14:26:20+5:30

सावरकरनगर, महात्मानगर, गंगापूररोड ,नाशिकरोड, सिडको, पंचवटी, सातपूर, मध्य नाशिक, अंबड अशा विविध उपनगरांमध्ये झाडे कोसळल्याची माहिती अग्निशमन दलाला नागरिकांकडून प्राप्त होऊ लागली.

'Nature' angry: 190 trees fell in the city due to strong winds | ‘निसर्ग’ कोपला : वादळी वाऱ्याने शहरात १९० वृक्ष उन्मळून पडले

‘निसर्ग’ कोपला : वादळी वाऱ्याने शहरात १९० वृक्ष उन्मळून पडले

googlenewsNext
ठळक मुद्देपरदेशी वृक्ष अधिक उन्मळून पडलेदुरदृष्टीतून लागवड करणे काळाची गरजअग्निशमन दलाच्या जवानांची कसरत

नाशिक : मुंबईकडून ‘निसर्ग’ चक्रीवादळाने बुधवारी (दि.३) संध्याकाळी आता उत्तर महाराष्टÑाकडे आगेकुच करताच त्याचा प्रभाव अत्यंत तीव्र स्वरुपात रात्री उशिरापर्यंत नाशिक शहरासह जिल्ह्यात जाणवला. वारे ताशी ५० ते ६० किमी इतक्या वेगाने वाहू लागल्याने शहरातील विविध उपनगरांमध्ये सुमारे १९० लहान मोठे वृक्ष कोसळल्याची माहिती अग्निशमन दलाच्या मुख्यालयाने दिली.
संध्याकाळी सात वाजेपासून आतापर्यंत नाशिक अग्निशमन दलाच्या मुख्यालयासह पाच उपकेंद्रांचे जवान बंबासह विविध भागांमध्ये दाखल होऊन रस्त्यांवर कोसळलेल्या झाडांच्या फांद्या कापून अडथळा दूर करण्याचा युध्दपातळीवर प्रयत्न करत आहेत.
ठाणे जिल्ह्यामार्गे हे वादळ उत्तर महाराष्टÑाच्या दिशेने रात्री झेपावले. वादळाचा तडाखा प्रत्यक्षरित्या नाशिक जिल्ह्याला बसला नसला तरी त्याच्या प्रभावाने मात्र जिल्ह्यात हाहाकार माजविला. शहरात वादळी वा-यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. मध्यरात्री उशिरापर्यंत पाऊस कोसळत होता. सुमारे शंभर मिमीपेक्षा अधिक पाऊस रात्री साडेआठ वाजेपासून पुढे पहाटेपर्यंत पडल्याची नोंद झाली. यावरून वादळी पावसाची तीव्रता सहज लक्षात येते. वारे ताशी ५० ते ६० किमी इतक्या वेगाने वाहू लागल्यामुळे शहरात ठिकठिकाणी वृक्ष कोसळले. गडकरी चौकातील आयकर भवनामध्ये असलेला अत्यंत जुना महाकाय वटवृक्षदेखील उन्मळून पडला.

यावरून वादळी वा-याचा अंदाज सहज बांधता येऊ शकतो.
संध्याकाळी वेगाने वाहणा-या वा-यामुळे झाडे एखाद्या झोक्यासारखे हलू लागले होते. झाडांच्या फांद्या थेट जमिनीला भिडू लागल्या होत्या. सात वाजेपासून शहरातील विविध उपनगरांमध्ये झाडे कोसळण्याच्या घटना सुरू झाल्या आणि अग्निशमन दलाच्या मुख्यालयासह विविध उपकेंद्रांचे दुरध्वनी खणखणू लागले. सावरकरनगर, महात्मानगर, गंगापूररोड ,नाशिकरोड, सिडको, पंचवटी, सातपूर, मध्य नाशिक, अंबड अशा विविध उपनगरांमध्ये झाडे कोसळल्याची माहिती अग्निशमन दलाला नागरिकांकडून प्राप्त होऊ लागली. गल्लीबोळात झाडे कोसळली तर कोठे फांद्या तुटून पडल्या. या वादळी वा-याच्या तडाख्यात कोसळलेल्या झाडांमुळे कोठेही सुदैवाने जीवीतहानी झाली नाही. काही ठिकाणी किरकोळ स्वरुपात वाहनांचे नुकसान झाले.

अग्निशमन दलाच्या जवानांची कसरत

अग्निशमन दलाच्या शिंगाडा तलाव येथील मुख्यालयासह सर्वच उपकेंद्रांवरील लिडिंग फायरमन, फायरमन, बंबचालक यांनी अहोरात्र प्रयत्न करून कोसळलेल्या झाडांचा अडथळा रात्री भर पावसातच दूर करण्यास सुरूवात केली होती. रात्रपाळीच्या कर्मचाऱ्यांनी शक्य तितके ‘कॉल’ रात्रीच पुर्ण केले तर काही राहिलेले कॉल दिवस उगवताच पुर्ण करण्यास सुरूवात केली. इतक्या मोठ्या प्रमाणात वृक्ष कोसळण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे जवानांनी सांगितले. शहराच्या सर्वच भागांमधून झाडे कोसळल्याची माहिती मिळून लागल्याने जवानांची धावपळ उडाली.

 

Web Title: 'Nature' angry: 190 trees fell in the city due to strong winds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.