गोदाकाठाला कचराकुंडीचे स्वरूप
By admin | Published: October 20, 2015 09:03 PM2015-10-20T21:03:04+5:302015-10-20T21:04:54+5:30
शेकडो नागरिकांचे आरोग्य धोक्यात : मनपा आरोग्य विभागाचे दुर्लक्ष
पंचवटी : सिंहस्थ कुंभमेळ्याला महिन्याभराचा कालावधी उलटत नाही तोच गोदाकाठ परिसरात दिवसेंदिवस कचरा पडून राहण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने सध्या येथील परिसराला कचराकुंडीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. गोदाकाठचा परिसर धार्मिक स्थळ असल्याने या भागात मनपाच्या आरोग्य विभागाने कायम स्वच्छता ठेवणे गरजेचे असताना पंचवटी आरोग्य विभागाचे दुर्लक्ष झाल्याने शेकडो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
सध्या सण-उत्सवाचे दिवस असल्याने शेकडो भाविक गंगाघाट परिसरात रामकुंडावर, तसेच सांडव्यावरची देवी मंदिरात दर्शनासाठी येत असतात. गंगाघाट परिसरातील भाजीबाजारासमोरील साईबाबा मंदिरासमोरच मोठ्या प्रमाणात कचरा पडलेला आहे. याशिवाय रामसेतू पुलाजवळ असलेल्या नदीपात्रालगत मोठा कचरा साचलेला असला तरी याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कालावधीत प्रशासनाने भाजीबाजार हटविला असला तरी मोठ्या प्रमाणात केरकचरा साचत असल्याने परिसरातील नागरिक बिनधास्तपणे कचरा टाकत असल्याने आरोग्य विभागाकडून त्यांच्यावरही कारवाई केली जात नाही. मंगळवारी दुपारी एक वाजेपर्यंत कचऱ्याचा ढिगारा साचून असला तरी घंटागाडी कर्मचाऱ्यांकडून तो उचलला तर गेला नाहीच, शिवाय पंचवटी मनपाच्या आरोग्य विभागाचेदेखील लक्ष वेधले गेले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (वार्ताहर)
कलशच कचराकुंडीत
मनपा प्रशासनाने गंगाघाट परिसरात अनेक ठिकाणी कचरा संकलनाचे कलश ठेवलेले होते. मात्र प्रशासनाने हेच कलश थेट कचराकुंडीत ठेवल्याने ते कचराकुंडी असल्याचे चित्र सध्या गंगाघाटावर दिसून येते. प्रशासनाने कचरा संकलनासाठी ठेवलेले कलश प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कचराकुंडीत पडून असल्याने आरोग्य विभाग सुस्त असल्याचे बोलले जात आहे.