निसर्ग माहिती केंद्र उरले शोभेपुरतेच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:17 AM2021-02-25T04:17:28+5:302021-02-25T04:17:28+5:30
नाशिक : येथील त्र्यंबक रोडवरील पश्चिम वन विभाग कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच २००३ साली सिंहस्थ कुंभपर्वानिमित्त साकारण्यात आलेले ‘निसर्ग माहिती केंद्र’ ...
नाशिक : येथील त्र्यंबक रोडवरील पश्चिम वन विभाग कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच २००३ साली सिंहस्थ कुंभपर्वानिमित्त साकारण्यात आलेले ‘निसर्ग माहिती केंद्र’ सध्या धूळखात पडून आहे. या केंद्राची पूर्णत: रया गेली असून, देखभाल, दुरुस्तीअभावी या वास्तूची दुर्दशा होऊन अवकळा आली आहे. हे माहिती केंद्र मागील काही वर्षांपासून कुलूपबंदच असल्याने केवळ शोभेपुरतेच उरले आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या औचित्याने २००३ साली वन विभाग कार्यालयाच्या आवारात निसर्ग माहिती केंद्र उभारण्यात आले होते. कुंभमेळ्याच्यानिमित्ताने शहरात देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविक, पर्यटकांना नाशिक जिल्ह्याची जैवविविधता आणि निसर्गाची ओळख व्हावी, हा यामागील उद्देश होता. नव्याचे नऊ दिवसांपुरते या केंद्राचे अस्तित्व टिकून राहिले; मात्र काळानुरूप येथील केंद्राचे तीनतेरा वाजले. २०१५ साली झालेल्या कुंभमेळ्यातसुद्धा या केंद्राला लागलेले दुरवस्थेचे ग्रहण दुर्दैवाने सुटू शकले नाही. कुंभमेळा होऊन पाच ते सहा वर्षांचा कालावधी लोटला असून, अद्यापही या केंद्राची अवकळा दूर करण्याकरिता संबंधित विभागाकडून कुठलेही प्रयत्न होत नसल्याने सर्वसामान्यांमध्ये निसर्गप्रेम वाढणार तरी कसे, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. लोकोपयोगी विविध विकासकामांवर लाखो ते कोट्यवधी रुपयांचा खर्च शासनाकडून होत असताना जिल्हा प्रशासन किंवा वन विभागाने हे माहिती केंद्र पुन्हा नव्याने अस्तित्वात आणण्याकरिता प्रयत्न केल्याचे अजून तरी दिसून येत नाही. शहरात निसर्गाचा परिचय करून देणारे एकही केंद्र सध्या अस्तित्वात नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात हे केंद्र उभारण्यात आलेले असताना केवळ देखभाल, दुरुस्तीअभावी पश्चिम वन विभागीय कार्यालयातील माहिती केंद्राला अवकळा प्राप्त झाली, हे विशेष!
---इन्फो---
निधीही मिळेना अन् कोणी लक्षही देईना
२००३ साली उभारण्यात आलेल्या हे निसर्ग माहिती केंद्र पुन्हा नव्याने सुरू करण्याकरिता भल्या मोठ्या निधीची आवश्यकता भासणार आहे, असे नाही; मात्र मागील आठ ते दहा वर्षांमध्ये या केंद्राला आलेली अवकळा दूर करण्याकरिता कोणत्याही अधिकाऱ्याने लक्ष दिले नाही. पश्चिम वन विभागीय कार्यालयातून नाशिक जिल्ह्याच्या आठ ते नऊ वनपरिक्षेत्रांचे नियंत्रण केले जाते; मात्र याच कार्यालयाच्या आवारात असलेली ही लोकोपयोगी वास्तू दुर्लक्षित राहिल्याने संताप व्यक्त होत आहे.
---
फोटो क्र : २१पीएचएफबी७७