सोयगाव परिसराला तलावाचे स्वरूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 11:37 PM2019-12-15T23:37:07+5:302019-12-16T00:28:12+5:30
आॅक्टोबर अखेरीस झालेल्या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी साचले पण आता पावसाळा उलटून बरेच दिवस झालेत तरीही डीे. के. कॉर्नर ते सबस्टेशन रस्त्यावर पाणी साचले असून तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
सोयगाव : आॅक्टोबर अखेरीस झालेल्या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी साचले पण आता पावसाळा उलटून बरेच दिवस झालेत तरीही डीे. के. कॉर्नर ते सबस्टेशन रस्त्यावर पाणी साचले असून तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
या भागाकडे उतार असल्याने कृषी नगर, चर्चगेट भागातील पाणी या भागात वाहत येते. तसेच पाण्यामुळे रस्त्यांची चाळणी झाली आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. तसेच दाभाडी, रोकडोबानगर या ग्रामीण भागातील लोकांचाही या रस्त्याने वावर असतो. तसेच शाळकरी मुले, नोकरदार यांनाही याचा सामना करावा लागतो. खड्ड्यांच्या पाण्यामुळे अंदाज येत नसल्याने वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच या रस्त्यालगत नागरी वस्तीही मोठ्या प्रमाणात असल्याने येथील रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
नवीन वाहनचालकांना माहित नसल्याने पडझड तर नेहमीची झाली आहे. रिकाम्या प्लॉटवर पाणी साचून दुर्गंधी, किटक डासांचा उपद्रव वाढला आहे. यामुळे परिसरात रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. मोकाट प्राणी येऊन घाण करतात. घराबाहेर पाऊल ठेवताच पाण्याचा संघर्ष करावा लागतोच. अनेक वेळा मोठ्या गाड्या बंद पडतात तसेच रात्रीच्या वेळी रस्त्याच्या बाजुने पथदीप नसल्याने अंधार राहतो यामुळे अनेक अडचणी निर्माण होतात. तरीही पालिका महापालिका प्रशासनाला जाग आली नाही. तरी लवकरात लवकर पाण्याची योग्य विल्हेवाट लावावी व रस्ता दुरूस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली.
उपमहापौरांकडून समस्या सुटण्याची अपेक्षा
सोयगाव येथील डे. के. कॉर्नर ते सबस्टेशन रस्त्यावर पाणी साचले असून, तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अशी परिस्थिती फक्त याच भागातील नसून सोयगावसह संपूर्ण शहरात आहे. शहरातील अनेक भागात रस्त्यांची चाळण झाली आहे. यामुळे बºयाच ठिकाणी खड्ड्यात पाणी साचले आहे. यामुळे वाहनचालकांसह पायी चालणाºया नागरिकांना कसरत करावी लागते. रस्त्याने प्रवास करताना जीव मुठीत घेऊन चालावे लागते. गटार काम नळजोडणी अशा अनेक कामांसाठीदेखील रस्ते खोदले जातात. तसेच साचलेल्या पाण्यामुळे रोगराई वाढत आहे. यामुळे शहरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वेळा तक्रारी करुनही महानगरपालिकेसह स्थानिक नगरसेवकदेखील या समस्यांकडे लक्ष देत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. कचरा, दुर्गंधी अशा समस्याही दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. समस्यांचा ग्रामीण भागातील लोकांनाही त्रास सहन करावा लागतो. सोयगावातील नववसाहत, शिव कॉलनी, चर्चगेट रोड, मित्रनगर, एकतानगर अशा भागात मोठ्या समस्या आहेत. उपमहापौर ही सोयगाव येथील असल्याने लवकरच विकासकामे होतील अशी आशा नागरिकांमध्ये आहे.