कोरोनाविरुद्धच्या लढ्याला लोकचळवळीचे स्वरूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 05:50 PM2020-07-20T17:50:15+5:302020-07-20T17:55:25+5:30
नाशिक : नाशिक विभागात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण वाढत असून, त्याच्या अटकावासाठी शासनपातळीवर विविध प्रयत्न केले जात ...
नाशिक : नाशिक विभागात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण वाढत असून, त्याच्या अटकावासाठी शासनपातळीवर विविध प्रयत्न केले जात असताना गावपातळीवरील लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांनीही या प्रयत्नात सहभागी व्हावे यासाठी विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी कोरोना विरुद्धच्या लढ्यात लोक चळवळीचे स्वरूप देण्याचे आवाहन केले आहे.
या संदर्भातील विभागातील सर्व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा परिषद अध्यक्षांना पत्र पाठवून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तालुका स्तरावर जिल्हा परिषद गट व पंचायत समितीच्या गण स्तरावर भेटी देऊन ग्रामस्थांच्या बैठकांचे आयोजन करून त्यासाठी आरोग्य यंत्रणा, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नगरपरिषद, ग्रामपंचायत, स्थानिक लोकप्रतिनिधी व सेवाभावी संस्था, सामाजिक कार्यकर्त्यांना त्यात सहभागी करून घ्यावे. गट व गणनिहाय समित्या स्थापन करून त्यांच्या माध्यमातून कोरोनाबाबत जनजागृती करणे, चाचण्या वाढविणे, कोरोना रुग्णांचे व्यवस्थापन व विलगीकरण करणे, लक्षणे नसलेल्या रुग्णांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, त्यांना घरातच विलगीकरण करून औषधोपचार करणे, खासगी डॉक्टरांकडून अशा रुग्णांची होणारी फसवणूक रोखणे आदी उपायोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
कोरोना रुग्णास वेळेवर औेषधोपचार होईल याबाबत मदत करण्याबरोबरच रुग्णाचे मानसिक धैर्य टिकवून ठेवण्यासाठी रुग्णाचे व त्याच्या कुटुंबीयाचे समुपदेशन करून कोणताही रुग्ण औषधोपचाराअभावी दगावणार नाही याबाबत दक्षता घेण्याच्या सूचनाही माने यांनी केल्या आहेत.