देवी मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप
By admin | Published: October 8, 2016 12:18 AM2016-10-08T00:18:43+5:302016-10-08T00:30:18+5:30
नवरात्रोत्सव : सिन्नर, निफाड, ओझरला विविध कार्यक्रमांचे आयोजन
निफाड : परिसरातील दहा गावांमधील एकूण २६ मंडळांनी देवीमूर्तींची स्थापना केली आहे.
निफाड मार्केट यार्ड येथील अजिंक्ययोद्धा मित्रमंडळ, कोळवाडीरोड येथील रायगड मित्रमंडळ, भवानी चौकातील एकता मित्रमंडळ, शांतीनगर येथील सप्तशृंगी देवी ट्रस्ट, कापसे गल्लीतील कापसे फे्रण्ड सर्कल, जनार्दनस्वामीनगर येथील शिवनेरी मित्रमंडळ, अकोलखास गल्लीतील बजरंग मित्रमंडळ, राजीव गांधी नगर येथील जय मातादी मित्रमंडळ, गणेशनगरमधील रामराज्य युवा प्रतिष्ठान, कृष्ण मंदिराजवळील महाराणा प्रताप मित्रमंडळ, अगस्तीनगर येथील गजराज मित्रमंडळ, तसेच गायत्रीनगर मित्रमंडळ, उमिया मित्रमंडळ, शंकरनगर मित्रमंडळ आदि १४ मंडळांनी देवीमूर्तींची स्थापना केली आहे.
तसेच उगाव, कुंदेवाडी, वनसगाव, खेडे, दिंडोरी तास, कोठुरे, शिवडी, पिंपळस, पिंप्री नांदूरमधमेश्वर येथेही विविध मंडळांनी देवीमूर्तींची स्थापना केली आहे.
निफाड येथील
नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील शांतीनगरनिवासिनी सप्तशृंगी देवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची गर्दी होत आहे. मंदिर परिसरात व मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली असून, गाभाऱ्यातील फुलांची केलेली आरास लक्ष वेधून घेत आहे. रोज सकाळी ७ व सायंकाळी ७ वाजता होणाऱ्या देवीच्या आरतीला महिलावर्ग हजेरी लावत आहे. मंदिरातील नवरात्रोत्सवाला ३८ वर्षांची परंपरा लाभली आहे. कै. शांतीलालजी सोनी यांनी मंदिरात सुरू केलेली नवरात्रोत्सव परंपरा शांतीनगर कला व क्रीडा मित्रमंडळाच्या तरुण पदाधिकाऱ्यांनी मोठ्या उत्साहात सुरू ठेवली आहे. निफाड शहर आणि परिसरातील हजारो भाविक तसेच औरंगाबाद, नाशिककडे खासगी वाहनाने प्रवास करणारे भाविक श्रद्धेने सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी गर्दी करतात. संगमरवराची देवीची प्रसन्न मूर्ती भाविकांना समाधान देऊन जाते.
निफाड शहरात असलेल्या उगावकर वाड्यातील रेणुकामाता, नांदुर्डीरोडवर व कोर्टाच्या आवारातील लक्ष्मी देवी मंदिर आणि उपजिल्हा
रुग्णालयाजवळील देवी मंदिरात घटस्थापना करण्यात आली आहे.
शहरात काही तरुण मंडळांनीही देवीची स्थापना केली आहे. मार्केट कमिटी आवारात अजिंक्ययोद्धा ग्रुप व उगावरोडवरील रायगड ग्रुपने आनंद मेळ्याचे आयोजन केले आहे. या आनंद मेळ्यात रहाट पाळणा, टोरा टोरा, ब्रेक डान्स आदि पाळण्याचे प्रकार, लहान मुलांचे मनोरंजन करणारी खेळणी यामुळे जत्रेचे स्वरूप आले आहे. या ठिकाणी देवी दर्शनासाठी आलेले भाविक आवर्जून मेळ्यास भेट देऊन पाळणे खेळण्याचा आनंद लुटत आहेत. शहरातील मोठ्या मंडळांनीसुद्धा विद्युत रोषणाई केली आहे. शांतीनगर येथील देवी मंदिरात नवमीच्या दिवशी चंडियागाचे आयोजन करण्यात आले आहे. विजयादशमीच्या दिवशी पारंपरिक पद्धतीने देवी मंदिर पटांगणावर रावणदहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे संयोजकांनी सांगितले.