नवीबेजच्या युवकाची जिल्हाधिकारीपदाला गवसणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 04:14 PM2019-05-06T16:14:56+5:302019-05-06T16:15:26+5:30
नागरी सत्कार : भूमिपुत्रांची गावातून काढली मिरवणूक
कळवण -तालुक्यातील नवीबेज येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबातील सुपुत्र नवजीवन विजय पवार याने वयाच्या २३ व्या वर्षी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात ३१६ वे रॅँकींग मिळवून पहिल्याच प्रयत्नात आयएएस होण्याचा मान मिळवित जिल्हाधिकारीपदाला गवसणी घातली. त्याबद्दल नवीबेज ग्रामस्थांच्यावतीने नवजीवनच्या नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
नवीबेजचा नातू तेजस पगार याने तालुक्यात पहिला आयएएस होण्याचा मान मिळविला होता. आता त्यापाठोपाठ यश संपादन करणाऱ्या नवीबेजच्या नवजीवन पवार याचा ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कारऔरंगाबाद विभागाचे निवृत्त महसूल आयुक्त पुरु षोत्तम भापकर यांच्या हस्तेू करण्यात आला. यावेळी नवजीवनचे वडील विजय पवार आणि आई जयश्री पवार यांचाही सत्कार करण्यात आला. त्यासबरोबर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेला मटाणे येथील जयेश आहेर ,मेशी येथील निकेतन कदम ,सांगली येथील निलेश कुंभार व नाशिकरोड येथील रियाझ अहमद यांचाही सत्कार मविप्रचे माजी सभापती नितीन ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. नवीबेज गावातून आयएएस झालेल्या नवजीवन पवार, जयेश आहेर निकेतन कदम ,निलेश कुंभार रियाझ अहमद यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी आमदार डॉ राहुल आहेर, शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देविदास पवार, माजी प्राचार्य जे. एस. पवार, वसाकाचे माजी संचालक बाजीराव पवार , मविप्रचे माजी उपसभापती विजय पवार, जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, बाजार समिती सभापती धनंजय पवार आदीसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावाशी नाळ तुटायला नको
यावेळी पुरु षोत्तम भापकर यांनी सांगितले, की मनात जिद्द ,दृढ आत्मविश्वास ,मेहनत करण्याची तयारी असेल तर कोणतेही स्वप्न सहज साध्य करता येऊ शकते. पालकांनी आपल्या पाल्यांना दर्जेदार शिक्षण देऊन स्पर्धा परीक्षा देणे गरजेचे आहे . आपल्या मुलांना कोणती दिशा द्यायची याचा विचार पालकांनी करायला पाहिजे. स्पर्धा परीक्षेत यश मिळाले तरी गावची नाळ तुटायला नको, असेही भापकर म्हणाले.