पालक गमावलेल्या बालकांच्या शिक्षणासाठी ‘नवचेतना’ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:15 AM2021-05-09T04:15:41+5:302021-05-09T04:15:41+5:30
नाशिक : गत वर्षभरात अनेक कुटुंबातील बालकांनी त्यांचे वडील, आई अशा कर्त्या व्यक्तींना गमावले आहे. अशा दुर्दैवी बालकांच्या शिक्षणात ...
नाशिक : गत वर्षभरात अनेक कुटुंबातील बालकांनी त्यांचे वडील, आई अशा कर्त्या व्यक्तींना गमावले आहे. अशा दुर्दैवी बालकांच्या शिक्षणात बाधा येऊ नये, त्यांचे शिक्षण खंडित होऊ नये तसेच त्यांच्या शैक्षणिक गरजांसह मानसिक गरजांचीही पूर्तता होण्याची नितांत गरज आहे. त्यासाठीच नाशिकच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी एकत्र येऊन ‘नवचेतना’ या अनोख्या उपक्रमाच्या माध्यमातून पाऊल पुढे टाकले आहे. अशा बालकांच्या पुढील संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांना पायावर उभे करण्याचा ध्यास ‘नवचेतना’च्या माध्यमातून घेण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्यात कोविडच्या प्रकोपाने आतापर्यंत साडेतीन हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत ज्या कुटुंबातील एकमेव कमावत्या किंवा कर्त्या व्यक्तीचे निधन झाले किंवा मातेचे निधन झाले, अशा कुटुंबातील बालकांचे शिक्षण पैशांअभावी खंडित होऊ शकते किंवा त्यांच्या शिक्षणात बाधा येऊ शकते. या बाबीचा विचार करुन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आणि प्रख्यात उद्योजक हेमंत राठी, सामाजिक कार्यासाठी पुढाकार घेणारे प्राचार्य प्रशांत पाटील, ‘निमा’चे माजी अध्यक्ष मधुकर ब्राह्मणकर यांच्यासह काही अन्य मान्यवरांनी एकत्र येऊन अशा बालकांसाठी नवचेतना या नावाने मदतीसाठी पुढाकार घेण्याचा निर्धार केला आहे. अनेक मुला-मुलींच्या आई किंवा वडिलांचे निधन झाल्याने त्यांच्यावर जणू आभाळ कोसळले आहे. तसेच ज्यांचे शिक्षण खंडित होण्याने त्यांच्या पुढील आयुष्याचा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी नवचेतनाच्या माध्यमातून हा पुढाकार घेण्यात आला आहे. पालक गमावलेला मुलगा किंवा मुलगी हे सक्षमपणे त्यांच्या पायावर उभे राहायला हवे, त्यामुळेच अशा विद्यार्थ्यांना त्यांचे पुढील शिक्षण होईपर्यंत शिक्षणाकरिता मदत तसेच त्यांच्या योग्य वाटचालीसाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी, शैक्षणिक साहित्य आणि शिक्षणाकरिता येणारा अन्य खर्च, कौशल्य विकासासाठीचा खर्च त्यांचे शिक्षण पूर्ण होण्यापर्यंत नवचेतनाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. तसेच ज्या बालकांचे आई, वडील कोरोनाने हिरावले गेले आहेत, अशा बालकांना वात्सल्याचीही उणीव जाणवू नये, यासाठी समाजबांधवांचा त्यातील सहभाग वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.
-------
अशा आपत्तीच्या काळात ज्या बालकांचे आई किंवा वडील हिरावले गेले आहेत, त्यांच्या शिक्षणासाठी समाजातून पुढाकार घेतला जावा, या उद्देशाने हे पाऊल उचचले आहे. त्यासाठी समाजातील अनेक मान्यवर, दानशूर व्यक्ती नक्कीच पुढे येऊन अशा विद्यार्थ्यांना आवश्यक आणि योग्य ती मदत करतील, हा विश्वास आहे. केवळ एक-दोन वर्ष नव्हे तर ती मुले पायावर उभी होईपर्यंत पुढील १५ वर्षे हा उपक्रम सुरु ठेवून अशा बालकांमध्ये नवचेतना निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.
- हेमंत राठी, उद्योजक