दर्पण प्रोजेक्टमुळे टपाल विभागाला मिळणार नवसंजीवनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 05:19 PM2019-06-30T17:19:43+5:302019-06-30T17:20:56+5:30
सिन्नर : मोबाईल व इंटरनेटचा वाढता प्रभाव तसेच कुरिअर कंपनी यांच्या स्पर्धेचा सामना पोस्टाला करावा लागत आहे. यामुळेच पोस्टानेसुद्धा कात टाकत नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यास सुरूवात केली आहे. याचाच भाग म्हणून आयटी आधुनिकीकरण प्रोजेक्ट २०१२ अंतर्गत ग्रामीण भागातील असलेल्या १ लाख ३० हजार पोस्ट कार्यालयांना सक्षम व आधुनिक करण्यासाठी दर्पण प्रोजेक्ट अंमलात आणलेला आहे. डिजिटल अॅडव्हान्समेन्ट आॅफ रूरल पोस्ट आॅफिसेस फॉर अ न्यू इंडिया (दर्पण) अंतर्गत ग्रामीण भागातील पोस्ट आॅफिसला नव संजीवनी मिळणार आहे.
मागील ६ महिन्यापूर्वीच या प्रोजेक्टची यशस्वी सुरूवात झालेली आहे. नाशिक विभागातील २६७ शाखा डाकघर यामुळे डिजिटल झालेली आहेत. खेडेगावात बचतीचे व्यवहार, विम्याचे, मनी आॅर्डर तसेच टपाल वितरणाचे काम होते. यापूर्वी हा सर्व डेटा तालुक्याच्या सिन्नर आॅफिसला अपडेट केला जात असे. दर्पण प्रोजेक्ट अंतर्गत खेडेगावातील शाखा पोस्टमास्तर यांना आरआयसीटी उपकरण तसेच वीजेच्या समस्येवर मात करण्यासाठी सौर ऊर्जेवर चालणारे उपकरण दिले गेली आहेत. मागील ६ महिन्यापासून आरआयसीटी मशीनवर सर्व बचतीचे, विम्याचे टपाल वितरणाचे काम पूर्णपणे आॅनलाइन होत आहेत. रजिस्टर, स्पिडपोस्ट बुक झाल्यापासून तर ते वितरण करेपर्यंतचा सर्व प्रवास हा आॅनलाइन ट्रॅक व ट्रेस होत आहे. त्यामुळे ग्राहक समाधानी आहेत.