कौतुकास्पद! ज्योतिषाची भविष्यवाणी खोटी ठरवत 'त्याने' मेहनतीतून साकारले आयएएसचे स्वप्न

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 12:51 PM2022-01-12T12:51:23+5:302022-01-12T12:53:03+5:30

कळवण : आपल्या नशिबात काय लिहिले आहे हे जाणून घेण्यासाठी लोक अनेकदा ज्योतिषाला हात दाखवतात. मग, ते त्याचप्रमाणे आयुष्यात ...

navjeevan pawar The dream of IAS came true through hard work | कौतुकास्पद! ज्योतिषाची भविष्यवाणी खोटी ठरवत 'त्याने' मेहनतीतून साकारले आयएएसचे स्वप्न

कौतुकास्पद! ज्योतिषाची भविष्यवाणी खोटी ठरवत 'त्याने' मेहनतीतून साकारले आयएएसचे स्वप्न

Next

कळवण : आपल्या नशिबात काय लिहिले आहे हे जाणून घेण्यासाठी लोक अनेकदा ज्योतिषाला हात दाखवतात. मग, ते त्याचप्रमाणे आयुष्यात पुढे जातात पण, ज्योतिषाने सांगितलेल्या गोष्टी नाकारून यशाची नवी गाथा लिहिणारे फार कमी लोक असतात. हाताच्या रेषेऐवजी मेहनतीच्या बळावर नवजीवन पवार या अवघ्या २३ वर्षाच्या युवकाने पहिल्याच प्रयत्नात आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न साकारले असून या वाटेने निघालेल्या युवकांना नवजीवनची कहाणी निश्चितच प्रेरणादायी ठरेल.

कळवण तालुक्यातील नवीबेजचे रहिवासी असलेले नवजीवन यांचे वडील स्व. विजय तुकाराम पवार हे प्रगतशील शेतकरी होते. मविप्रचे उपसभापतीपद त्यांनी भूषविले होते. गेल्या वर्षी पितृछत्र हरपले तर, आई जयश्री पवार ह्या प्राथमिक शाळेत शिक्षिका आहेत. नवजीवन यांनी २७ मे २०१७ मध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. त्यानंतर एक महिन्याने २७ जूनला मित्रांसोबत ते दिल्लीला गेले आणि युपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. प्राथमिक परीक्षा ३ जून २०१८ रोजी होणार होती. नवजीवनने पहिल्याच प्रयत्नात प्राथमिक परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर २८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी चार महिन्यांचा अवधी देण्यात आला होता. त्यादरम्यान परीक्षेच्या २८ दिवसांपूर्वी नवजीवन यांना डेंग्यूची लागण झाली. त्यातून बरे होण्यासाठी त्यांना दिल्ली व नाशिक गाठावे लागले. मुख्य परीक्षेला अवघे २६ दिवस उरले होते. नाशिकच्या रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल असताना वडिलांनी सांगितले की, आता रडणे किंवा लढणे हे फक्त दोनच मार्ग आहेत.

नवजीवन यांनी लढायचे ठरवले. बारावीत शिकणाऱ्या भाचीने आणि बहिणीने हॉस्पिटलमध्ये नोट्स तयार केल्या. दिल्लीतील एक मित्र अर्थशास्त्राच्या तयारीसाठी व्हिडिओ कॉल करत असे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यावर १३ दिवसांनी मुख्य परीक्षा होणार होती. वारंवार येणाऱ्या संकटांमुळे मित्राच्या आग्रहाने ते ज्योतिषाला भेटले, त्यांनी वयाच्या २७ व्या वर्षांपर्यत आयएएस होणे शक्य नसल्याचे सांगितले. परंतु नवजीवन यांनी या सर्व खडतर प्रवासातून आयएएस होण्याचे आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. निकाल आल्यावर पहिल्याच प्रयत्नात आयएएस झाल्याचे पत्र कुटुंबीयांना लिहिले. मुलाखत २५ फेब्रुवारीला होती पण, नवजीवन यांना त्यांच्या तयारीवर पूर्ण विश्वास असल्याने नवजीवन पवार हे ३६० वा क्रमांक मिळवून आयएएस झाले आणि ज्योतिषाची भविष्यवाणीही खोटी ठरवली. सध्या ते मध्यप्रदेशातील कुक्षी येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून काम करीत आहेत.

 

Web Title: navjeevan pawar The dream of IAS came true through hard work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक