पिंपळगाव लेप येथील श्री रेणुका देवीचा नवरात्रोत्सव भाविकाविनाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2020 06:59 PM2020-10-20T18:59:52+5:302020-10-20T19:03:16+5:30
पिंपळगाव लेप : येथील श्री रेणूका देवी जागृत व नवसाला पावणारी देवी म्हणून पंचक्रोशीत प्रसिध्द आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी देवस्थान बंद असले तरी नित्यपूजा पाठ व धार्मिक कार्यक्रम मात्र भाविकांविना सुरू आहे.
पिंपळगाव लेप : येथील श्री रेणूका देवी जागृत व नवसाला पावणारी देवी म्हणून पंचक्रोशीत प्रसिध्द आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी देवस्थान बंद असले तरी नित्यपूजा पाठ व धार्मिक कार्यक्रम मात्र भाविकांविना सुरू आहे.
नवरात्रोत्सवात नऊ दिवस येथे घटस्थापना केली जाते. मंदिर व परिसर विद्युत रोषणाईने नटविला जातो, तर येथेही महिला नऊ दिवस घटी बसण्याची परंपरा आहे. दिवाळी नंतर पंंधरा दिवसांनी त्रिपुरारी पौर्णिमेस येथे देवीची मोठी यात्रा भरते. या यात्रेनिमित्त परिसरातील हजारो भाविक दर्शनासाठी येथे गर्दी करत असतात.
पिंपळगाव लेप येथील श्री रेणूका देवीला सुमारे तीनशे वर्षांपूर्वींचा इतिहास सांगितला जातो. पुरातन काळात गोपीनाथ सबनीस यांची माहुरगडच्या श्री रेणुका देवीवर एकनिष्ठ अपार श्रद्धा होती. ते नित्यनेमाने माहुरगडवर श्री रेणुका देवीच्या दर्शनासाठी पायी वारी करत. वृध्दापकाळाने त्यांना माहुरगडावर जाणे शक्य होणार नसल्याने त्यांनी शेवटची वारी म्हणून मजल-दर मजल करत माहुरगड गाठले. येथून पुढे येऊ शकत नसल्याने दु:खी होऊन साश्रूनयनांनी श्री रेणुकेचे दर्शन घेऊन बाहेर पडतांना मंदिरा बाहेर पडतांना ते अडखळत होते. सबनीस यांच्या भक्तीने प्रसन्न होवून देवीने मी तुझ्या गावी तुझ्या मागेमागे येईन, परंतु गाव येई पर्यंत तु मागे वळून बघायचे नाही. तु जर मागे वळून बघितलं तर मी येथेच गुप्त होईल. असा दृष्टांत दिला. सबनीस माहुरगडाहून पिंपळगाव लेप गावाकडे पायी निघाले परंतु देवी खरोखरच पाठीमागे येती आहे का, अशी शंका आली आणि त्यांनी गावाजवळ आल्यावर मागे वळून पाहिले. देवी खरंच आली होती, मात्र सबनीस मागे वळाल्याने देवी तिथेचं अंर्तधान पावली व शिळा झाली. त्याच ठिकाणी पुरातन काळात मंदिर उभारणी करण्यात आली. अशी अख्यायिका सांगीतली जाते.
सबनीस परिवाराकडून देवी भक्तीचा वारसा कायम आहे. सध्या पद्माकर सबनीस हे देवी पुजापाठाचे काम करतात. परिसरातील भाविक या ठिकाणी येवून देवीला नवस बोलतात. तर नवसपूर्ती करणारे जागृत देवस्थान म्हणूनही येथील देवीची ख्याती आहे. दरवर्षी शेंदुराचा लेप देवीच्या मुखवट्याला चढविला जात असल्याने थरावर थर होवून देवी मुर्तीचे स्वरूप बदलले होते. मात्र ग्रामस्थांच्या सहकार्याने विधीवत सदर लेप हटविण्यात आल्याने देवीची मुर्ती आकर्षक दिसू लागली. तेव्हापासून गावाची पिंपळगाव लेप अशी सरकारी दप्तरी नोंद झाल्याचे सांगीतले जाते.
(फोटो २० रेणुकादेवी)
येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप येथील मंदिरातील श्री रेणुका देवी तसेच भगवान परशुराम मूर्ती.