सप्तशृंगी गडावरील नवरात्रोत्सव यात्रा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 06:27 PM2020-10-08T18:27:27+5:302020-10-08T18:47:43+5:30
सप्तशृंगगड : लाखो भाविकांचे श्रद्धा स्थान व उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगगडावरील नवरात्रोत्सव कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता रद्द करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
सप्तशृंगगड : लाखो भाविकांचे श्रद्धा स्थान व उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगगडावरील नवरात्रोत्सव कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता रद्द करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
नवरात्र उत्सवात देवीची पुजाअर्चा व धार्मिक विधी पुजारी यांच्याकडूनच होणार असून मंदिरात घटस्थापना केली जाणार आहे. १७ आॅक्टोबरपासून यात्रोत्सवाला प्रारंभ होणार होता. परंतु, कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच कोल्हापूर, तुळजापुर, त्र्यंबकेश्वर याठिकाणच्याही यात्रा रद्द करण्याचा निर्णय झाला आहे. गडावर नवरात्रोत्सवात पुजारी, देवीचे सेवेकरी यांनाच फक्त मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे तसेच पायी येणारे भाविक अथवा ज्योत नेण्यासाठी व कावडधारकांसाठी, तसेच कोजागिरी पौर्णिमेला तृतीय पंथियांनाही बंदी घातली असुन देवी दर्शनासाठी संपूर्ण मंदिर बंद असेल असा आदेश जिल्हाधिकारी यांनी दिला आहे. बैठकीला कळवणचे तहसीलदार बंडू कापसे, पोलिस अधीक्षक सचिन पाटील, कळवणचे प्रांत अधिकारी विकास मीना, सप्तशृंगगड निवासिनी देवी ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहांतोडे तसेच पोलिस उपअधीक्षक शर्मिला वालावलकर, पोलिस उपविभागीय अधिकारी भिमाशंकर ढोले, पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, माजी उपसरपंच राजेश गवळी, सामाजिक कार्यकर्ते संदीप बेनके आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते.
जिल्ह्याच्या सीमा करणार सील
नंदुरबार, धुळे, मध्य प्रदेश, जळगाव व अन्य ठिकाणाहून काही भाविक कावड घेऊन निघाले असतील तर त्यांनी माघारी परतावे. त्यांनी आपल्या भागातील मंदिरातच पुजा करावी तसेच जिल्ह्याच्या सीमा सिल केल्या जाणार आहेत. जेणेकरून यात्रेसाठी कोणीही येणार नाही. नांदूरीच्या पायथ्यापासुनच बॅरीकेटस लावण्यात येणार आहे तसेच रडतोंडी घाटाच्या पायी मार्गाला व गणपतीकडील वणीच्या पायी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. यंदा ध्वजाची मिरवणूकही साध्या पद्धतीने साजरी करण्यात येणार आहे.
या वर्षी नवरात्र उत्सव यात्रा होणार नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारे भाविकांना सुविधा या ठिकाणी निर्माण केल्या जाणार नाहीत. याच बरोबर गडावर येण्यासाठी प्रवेश बंदी असेल. परंतु जे स्थानिक नागरीक आहेत त्यांना येण्या जाण्यासाठी पासेस दिले जातील. त्यामध्ये कुठलीही प्रवासी वाहतूक करण्यासाठी परवानगी नसेल.
- सूरज मांढरे, जिल्हाधिकारी
कोरोना या साथीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन देवी भक्तांची सप्तशृंगी देवीवर जितकी नितांत श्रद्धा आहे तितकीच त्यांच्या जीवीताची योग्य ती काळजी घेणे महत्वाचे असल्याने उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . दैनंदिन पुजाअर्चा, आरती वगळता इतर कोणतेही धार्मिक उपक्र म,मोफत अन्न दान,निवास व्यवस्था उपलब्ध नसेल. तसेच भाविकांसाठी सोशल मिडीयाचा वापर करून युट्युब, फेसबुकवरून आॅनलाईन दर्शनाची व्यवस्था केली जाणार आहे.
- सुदर्शन दहातोंडे, व्यवस्थापक, सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट.