नवसाचा मुलगाच जन्मदात्यांना झाला परका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:15 AM2021-05-07T04:15:14+5:302021-05-07T04:15:14+5:30
मुलगा हवा म्हणून... एक दोन नव्हे तर पाच मुलींना जन्म दिल्यानंतर पुत्र झाला. मोठ्या नवसाने वंशाला दिवा मिळाला. म्हणून ...
मुलगा हवा म्हणून... एक दोन नव्हे तर पाच मुलींना जन्म दिल्यानंतर पुत्र झाला. मोठ्या नवसाने वंशाला दिवा मिळाला. म्हणून आई -वडिलांनी देवीला गोड जेवणाची पंगत दिली. तिची ओटी खणा-नारळाने भरली. नवसाच्या अटीप्रमाणे मुलगा ११ वर्षांचा होईपर्यंत कुणाच्या घरी जाणे नाही, ११ वर्षे घराचा उंबरा ओलांडला नाही. एकाकी जीवन जगून मुलाला वाढवले. त्यासाठी शेतात बंगला बांधला. जुन्या घरातून नवीन घरी शेतात बंगल्यावर रहायला गेले.
वर्षामागे मागे वर्षं गेली. पाचही मुलींची लग्न झाली. त्यानंतर वंशाचा दिवा...मुलाचे लग्न मोठ्या थाटामाटात केले. लाखो रुपये लग्नात खर्च झाले. सुनेचे सगळे डोहाळे पुरवले. नातू मोठे झाले. उतरणीला वय लागलेल्या आई-वडिलांना कोरोना झाला आणि विपरीत घडले. ज्याच्यासाठी नवसायास केले त्यानेच आई-वडिलांना गावाकडील जुन्या पडक्या घरात वाऱ्यावर सोडून दिले. स्वत:च्या मरणाच्या भीतीने मुलगा व सून निघून गेले.
इन्फो
पती-पत्नीने घेतला निरोप
मोडकळीस आलेल्या जुन्या घराची पूर्व बाजू ढासळली तेथे नववार लुगड्याची सावली करून राहू लागले. वयाची सत्तरी ओलांडलेल्या म्हातारा-म्हातारीकडे नवसाचा मुलगा ढुंकूनदेखील पाहेनासा झाला. दोघे कोरोनाने बाधित असल्याने त्यांच्या जवळ इतर कोणी जात नसे. मुलगा आणि सून त्यांच्याकडे फिरकलेच नाहीत. हे मुलींना कळाले तेव्हा त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते, तर आई शेवटच्या घटका मोजत होती. पतीच्या निधनानंतर त्या माउलीनेदेखील प्राण सोडले. तालुक्यात एका कुटुंबात ही दुर्दैवी घटना घडली असून, कोरोनाच्या या भयाने नातेसंबंधातही बाधा येत असल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे.