नवरंगी कारंजाचे शंभरफुटी उड्डाण
By admin | Published: December 28, 2016 01:07 AM2016-12-28T01:07:35+5:302016-12-28T01:07:55+5:30
राज्यातील एकमेव उंच कारंजा असल्याचा राज ठाकरे यांचा दावा
नाशिक : लाल, हिरवा, पिवळा, जांभळा, नारंगी अशा नवरंगाने प्रकाशमान झालेल्या घारपुरे घाट पुलाजवळ गोदापात्रात रोषणाईने उजळलेला महापालिकेच्या कारंजाचे शंभर फुटांपर्यंत उडणाऱ्या तुषारांनी मंगळवारी (दि.२७) संध्याकाळी नाशिककरांचे डोळ्यांचे पारणे फेडले.
महापालिकेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी सुशोभिकरणाची कामे करण्यात आली असून, या कामांची पाहणी व लोकार्पण मंगळवारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे व अभिनेता नाना पाटेकर, भरत जाधव, पुष्कर श्रोत्री, दिग्दर्शक के दार शिंदे आदिंच्या उपस्थितीत करण्यात आले. संध्याकाळी राज ठाकरे व अभिनेत्यांचे घारपुरे घाट पुलावर आगमन झाले. सिनेसृष्टीतील मंडळींना बघण्यासाठी नाशिककरांची यावेळी एकच गर्दी लोटल्याने पोलिसांची धावपळ उडाली. नाना पाटेकर, भरत जाधव वाहनामधून खाली उतरताच चाहत्यांनी त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी गराडा घालण्याचा प्रयत्न के ला. यामुळे सुरक्षारक्षक व पोलिसांनी तातडीने कडे करून सर्व पाहुण्यांना पुलावरील संरक्षक जाळीपर्यंत आणले. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते कारंजाचे लोकार्पण करण्यात आले. नाना पाटेकर यांच्या हस्ते कळ दाबून कारंजा सुरू करण्यात आला आणि हळूहळू थेट शंभर फुटापर्यंत कारंजा वाढत गेला. रंगीबेरंगी रोषणाईने उजळलेला गोदापात्रातील कारंजा बघून नाशिककर सुखावले. नाशिकमध्ये हा एकमेव असा कारंजा असून, हा कारंजा बघण्यासाठी रात्री उशिरापर्यंत पुलावर बाळगोपाळांना घेऊन नागरिकांनी गर्दी केली होती. नदीपात्रात रोषणाईसह उभारण्यात आलेला गोदावरीमधील कारंजा हा नाशिकमधील नव्हे तर महाराष्ट्रातील सर्वांत उंच कारंजा असल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला.होळकर पुलावर ‘पाण्याचा पडदा’ महापालिकेच्या वतीने गोदावरीवरील ब्रिटिशकालीन अहल्याबाई होळकर पुलावर येत्या आठवडाभरात नाशिककरांना लेझर लाइटद्वारे आकर्षक पद्धतीचा ‘पाण्याचा पडदा’ नजरेस पडणार असल्याचा ‘शब्द’ नाशिककरांना दिला. होळकर पुलाचे सौंदर्य यामुळे खुलणार असल्याचे ठाकरे म्हणाले.