संस्कारक्षम युवा पिढीसाठी ‘एनसीसी’ प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 01:04 AM2017-11-26T01:04:18+5:302017-11-26T01:05:30+5:30
लष्करी सेवेत अधिकारी बनण्याच्या दृष्टीने युवा वर्गात जागृती निर्माण व्हावी यासाठी एनसीसी अर्थात राष्ट्रीय छात्रसेनेची स्थापना करण्यात आली. चारित्र्य, मैत्री, शिस्त, नि:धर्मी विचार, साहसी वृत्ती आणि नि:स्वार्थी सेवा असे गुण युवा पिढीत रुजल्याने संघटित प्रशिक्षित, प्रेरित तरुण पिढी तयार होण्यास मदत होते.भुदल, नौदल आणि हवाई दल अशा विविध दलांतील संधी या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होतात.
नाशिक : लष्करी सेवेत अधिकारी बनण्याच्या दृष्टीने युवा वर्गात जागृती निर्माण व्हावी यासाठी एनसीसी अर्थात राष्ट्रीय छात्रसेनेची स्थापना करण्यात आली. चारित्र्य, मैत्री, शिस्त, नि:धर्मी विचार, साहसी वृत्ती आणि नि:स्वार्थी सेवा असे गुण युवा पिढीत रुजल्याने संघटित प्रशिक्षित, प्रेरित तरुण पिढी तयार होण्यास मदत होते.भुदल, नौदल आणि हवाई दल अशा विविध दलांतील संधी या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होतात. रविवारी (दि. २६) संपूर्ण देशभरात एनसीसी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून, नाशिकमध्ये या दिनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवार (दि. २१) ते रविवार (दि. २६) असा एनसीसी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय छात्र सेना प्रशिक्षण कनिष्ठ आणि वरिष्ठ अशा दोन पातळ्यांवर घेण्यात येते. यामध्ये कनिष्ठ पातळीत इयत्ता आठवी आणि नववी, तर वरिष्ठ पातळीत इयत्ता अकरावी ते पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना सहभागी होता येते. कनिष्ठ पातळीवर घेण्यात येणाºया शिक्षणक्रमात दोन वर्षे प्रशिक्षण आणि एक परीक्षा तर वरिष्ठ पातळीवर घेण्यात येणाºया शिक्षणक्रमात पहिल्या दोन वर्षांत एक कॅम्प आणि एक परीक्षा तर अखेरच्या एका वर्षात एक कॅम्प आणि एक परीक्षा देणे विद्यार्थ्यांना बंधनकारक असते. हे प्रशिक्षण पूर्ण करणाºया विद्यार्थ्यांना लष्करातील लेखीपरीक्षा माफ करून थेट मुलाखत आणि वैद्यकीय चाचणीसाठी पाठविण्यात येते. नाशिकचे एनसीसी बटालियन हे राज्यात सर्वांत मोठे असून, यामध्ये तीन हजारांहून अधिक विद्यार्थी एनसीसीचे प्रशिक्षण घेतात. जून २०१७ या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांसह विद्यार्थिनींना ३३ टक्केआरक्षण देण्यात आले आहे. नाशिकमध्ये भोसला मिलीटरी महाविद्यालयासह एचपीटी, बीवायके, केटीएचएम, बिटको महाविद्यालय, ना.रोड, एस.व्ही.के .टी महाविद्यालय, देवळाली, पंचवटी महाविद्यालयात एनसीसीचे प्रशिक्षण वर्ग घेण्यात येतात. यानिमित्त एचपीटीत परेड तसेच सैनिकी शस्त्रांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.
राष्ट्रीय छात्र सेना हे जगातील सर्वांत मोठे युवक संघटन आहे. या संघटनेमुळे देशात एकात्मता साधण्यासाठी मदत होण्याबरोबरच चांगले सैनिकी अधिकारीही घडतात. एनसीसीच्या विद्यार्थ्यांमध्ये निकोप स्पर्धेमुळे खिलाडूवृत्ती जागृत होते. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त बाणवते. विद्यार्थी आयुष्यभर शिस्तबद्ध राहतो तसेच राष्ट्रीय छात्रसेनेच्या विद्यार्थ्यांनी जीवनात कुठलाही करिअरचा पर्याय निवडला तरी तो यशस्वी होतो.
- मेजर विक्रांत कावळे
असोसिएट एनसीसी आॅफिसर (ए.एन.ओ) भोसला मिलीटरी स्कूल