चांदवडला राष्ट्रवादीने रोखला महामार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 03:58 PM2020-03-05T15:58:24+5:302020-03-05T15:58:47+5:30
रस्त्यावर ओतला कांदा : हमीभाव देण्यासह निर्यातबंदी उठविण्याची मागणी
चांदवड : कांदा पिकाला हमीभाव मिळावा आणि कांदा निर्यातबंदी त्वरित उठवावी या मागण्यांसाठी चांदवड तालुका राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या वतीने चांदवड येथील मुबंई-आग्रारोडवरील पेट्रोलपंप चौफुलीवर गुरुवारी (दि.५) दुपारी १२ वाजता रास्तारोको आंदोलन करत महामार्ग तासभर रोखून धरण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांदा ओतून देत निषेध नोंदविला शिवाय, नायब तहसीलदारांना कांद्याच्या माळा भेट देत प्रश्नाच्या गांभीर्याकडे लक्ष वेधले. या आंदोलनामुळे महामार्गावर दुतर्फा वाहनाच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.
राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्र पगार, तालुकाध्यक्ष व जिल्हा परिेषदेचे उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड , कृषी समितीचे सभापती संजय बनकर, जिल्हा पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार एस.पी.भादेकर, पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या कांदा पिकाला हमी भाव द्यावा, निर्यातबंदी त्वरीत उठवावी या प्रमुख मागण्यांचा निवेदनात समावेश होता. यावेळी जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार यांनी आंदोलकांसमोर शेतकºयांच्या भावना व्यक्त केल्या. कांदा व अन्य शेतीमाल कवडीमोल भावाने विकला जात आहे. त्यामुळे शासनाने १५ मार्चची वाट न पाहता तातडीने निर्यात बंदी उठवावी, तसेच कांदा व अन्य शेतीमालाला तातडीने हमीभाव जाहीर करावा अशी मागणी पगार यांनी केली.
हस्तक्षेप योजना राबवा
भारतीय कांदयाबाबत केंद्र सरकारने निर्याती बाबतचे धोरण स्थिर नसल्याने कांद्याचे भाव कमी होत आहेत. त्यामुळे शेतकरी हतबल झाला असून उत्पादन खर्च देखील निघत नाही. सरकारने बाजार हस्तक्षेप योजना राबवून कांद्याला किमान २५०० रुपये हमी भाव जाहीर करावा अशी मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली.