शिवसेनेला आव्हान राष्ट्रवादीचे; बालेकिल्ला कायम राखण्यासाठी ताकद पणाला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 09:21 AM2021-12-21T09:21:58+5:302021-12-21T09:22:22+5:30
देवळालीगाव, विहितगाव, सौभाग्यनगर, पिंपळगाव खांब, वडनेर, रेल्वेलाइन गाडेकर मळा, रोकडोबावाडी, सुंदरनगर, हरिओमनगर, औटे मळा असा संमिश्र लोकवस्तीचा प्रभाग असून, सध्या शिवसेनेचे केशव पोरजे सुनीता कोठुळे व राष्ट्रवादी काँग्रेसचे जगदीश पवार प्रतिनिधित्व करत आहे
नाशिक : चार गावठाण, मळे परिसर, काही झोपडपट्टी परिसर व मध्यम व उच्चभ्रू वस्ती असलेला प्रभाग क्रमांक २२ पहिल्यापासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. शिवसेनेने खालोखाल सध्या राष्ट्रवादीची ताकद वाढली असून मनसे, भाजप, काँग्रेस यांना मात्र बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे.
देवळालीगाव, विहितगाव, सौभाग्यनगर, पिंपळगाव खांब, वडनेर, रेल्वेलाइन गाडेकर मळा, रोकडोबावाडी, सुंदरनगर, हरिओमनगर, औटे मळा असा संमिश्र लोकवस्तीचा प्रभाग असून, सध्या शिवसेनेचे केशव पोरजे सुनीता कोठुळे व राष्ट्रवादी काँग्रेसचे जगदीश पवार प्रतिनिधित्व करत आहे. शिवसेनेच्या नगरसेविका सत्यभामा गाडेकर यांचे कोरोना काळात निधन झाले आहे. पहिल्यापासून प्रभागाचा हा परिसर शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. २०१७ मध्ये झालेल्या मनपाच्या निवडणुकीत भाजपकडून सरोज अहिरे निवडून आल्या होत्या. त्यांच्या रूपाने पहिल्यांदाच या प्रभागात कमळ फुलले होते. मात्र विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीचे घड्याळ हातावर बांधून आमदारकीला विजय मिळवला. दोन वर्षांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जगदीश पवार हे निवडून आल्याने नाशिकरोड विभागात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एकच नगरसेवक आहे. केशव पोरजे सुनीता कोठुळे हे दुसऱ्यांदा निवडून आले असून स्वर्गीय सत्यभामा गाडेकरदेखील या भागातून दुसऱ्यांदा निवडून आल्या होत्या. त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र योगेश गाडेकर सेनेचे प्रबळ दावेदार आहेत.
शिवसेने खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसची या प्रभागात चांगली ताकद आहे. त्यामानाने भाजप, मनसे, काँग्रेस यांच्याकडे इच्छुक असले तरी काही प्रबळ उमेदवाराचा शोध त्यांना घ्यावा लागणार आहे. गावठाण व मळे परिसर तसेच सगेसोयरे, नाते-गोते या प्रभागात मुख्य भूमिका ठरवते. पक्षापेक्षा नात्यागोत्याला जास्त महत्व प्रत्येक निवडणुकीत दिसून आले आहे. प्रभाग रचना व आरक्षण जाहीर झाल्यानंतर निवडणुकीचे गणित बदलून खरे चित्र स्पष्ट होईल अशी सद्य:स्थिती आहे.