Chhagan Bhujbal: “राज्यात भाजपचे सरकार येईल, पण...”; छगन भुजबळांचा देवेंद्र फडणवीसांना खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2022 03:32 PM2022-03-18T15:32:21+5:302022-03-18T15:33:38+5:30
गोव्यात मोठ्या प्रमाणात मतविभाजन झाले असून, भाजपची लाट आता कमी होताना दिसत आहे, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
नाशिक: गोव्यासह देशातील पाच राज्यांसह चार राज्यांमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारत मोठे यश मिळवले आहे. यानंतर आता भाजपचा आत्मविश्वास वाढल्याचे सांगितले जात आहे. गोव्यातील विजयोत्सव साजरा करण्यासाठी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) नागपुरात दाखल झाले, तेव्हा त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना महाराष्ट्रात पुन्हा भाजपचे सरकार आणणार असल्याचा निर्धार फडणवीस यांनी व्यक्त केला. यावर महाविकास आघाडीतील नेत्यांच्या प्रतिक्रिया येत असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला लगावला आहे.
नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना छगन भुजबळ यांनी भाजपवर निशाणा साधला. तसेच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महाविकास आघाडीचे लोक कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न करू, असे छगन भुजबळ म्हणाले. विधानसभा अध्यक्षाच्या निवडीसाठी राज्यपालांना विनंतीपत्र पाठवले आहे. त्यांनी आदेश दिला की लवकरात लवकर निवड होईल. उच्च न्यायालयानंही याबाबत लवकर निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती छगन भुजबळ यांनी यावेळी दिली.
राज्यात भाजपचे सरकार येईल, पण...
महाराष्ट्रात भाजपचे सरकार येईल असे त्यांचे नेते म्हणत असतील तर ठीक आहे. पण त्यासाठी त्यांना अडीच वर्षे थांबावे लागेल. जेव्हा विधानसभेच्या निवडणुका होतील, तेव्हा कळेलच. आता तरी तशी कुठलीही परिस्थिती नाही, असे सांगत, चार राज्यांत भाजपचा विजय झालेला आहे, हे आम्हाला मान्य आहे. पण भाजपची सत्ता आली असली तरी एकट्या उत्तर प्रदेशात भाजपचे ५० हून अधिक आमदार कमी झालेत. शरद पवार यांनी सांगितल्याप्रमाणे विरोधक वेगवेगळे न लढता एकत्र लढले असते तर चित्र वेगळे दिसले असते. भाजपची लाट ही कमी होताना दिसत आहे. गोव्यात भाजपचे सगळे विरोधक वेगवेगळे लढले. तिथे मतांचे मोठ्या प्रमाणावर विभाजन झाले, त्याचा फायदा भाजपला झाला, असे छगन भुजबळ म्हणाले.
दरम्यान, ओबीसी आरक्षण संदर्भात कमिशन नेमण्यात आले आहे. या कमिशनने कामही सुरू केले आहे. येत्या दोन महिन्यांत त्याचे काम पूर्ण करेल, अशी अपेक्षा आहे. राज्य सरकार प्रभाग रचना तयार करून निवडणूक आयोगाला देईल. त्यानंतर निवडणूक आयोगाने निवडणूक ठरवावी, असे भुजबळ यांनी नमूद केले आहे.