डोक्यावरच्या टोपीचा अन् अंत:करणाच्या रंगात काहीही फरक नाही; शरद पवारांचा राज्यपालांवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 05:29 PM2022-07-30T17:29:58+5:302022-07-30T17:30:02+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवारांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यावर टीका केली आहे.
नाशिक/मुंबई- मुंबई आणि ठाण्याच्या विकासात आणि विशेषतः मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी–गुजराथी समाजांचे योगदान उल्लेखनीय आहे, असं विधान राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केलं. मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोक निघून गेले तर या शहराला कोणी आर्थिक राजधानी म्हणणार नाही, अशा आशयाचं वक्तव्य त्यांनी यादरम्यान केलं. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यावरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर अनेकांकडून टीका होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवारांनी देखील आता भगत सिंह कोश्यारींवर निशाणा साधला आहे. राज्यपालांबद्दल काही बोलण्यासारखं आता राहिलेलं नाही. त्यांच्याबद्दल काही बोलायचं हे सांगणं कठीण आहे. महाराष्ट्र किंवा मुंबई सर्व जातीचे-धर्माचे लोकांना घेऊन जाणारे राज्य आणि शहर आहे. मुंबईची प्रगती ही सर्व सामान्य माणासांच्या कष्टातून झाली आहे, असं शरद पवार म्हणाले.
राज्यपालांनी अशा प्रकारची विधानं करणं हे काही शहाणपणाचं लक्षण नाहीय. मी त्याच्या फार खोलात जात नाही, कारण त्यांच्या डोक्यावरच्या टोपीचा आणि त्यांच्या अंत:करणाचा रंग, यात काहीही फरक नसल्याचं म्हणत शरद पवारांनी टीका केली आहे. तसेच याआधी देखील राज्यपालांनी सावित्राबाई फुले यांच्याबद्दलही एक भयानक विधान केलं होतं, असंही शरद पवार यावेळी म्हणाले. शरद पवार सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
दरम्यान, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचं विधान वैयक्तिक आहे. त्यामुळे आम्ही शिवसेना म्हणून राज्यपालांच्या मताशी सहमत नाही. मराठी लोकांचं मुंबईसाठी मोठं योगदान आहे. त्यामुळे मराठी माणसांचं योगदान कोणालाही नाकारता येणार नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. राज्यपाल म्हणजे एक प्रमुख पद असतं. त्यामुळे कोणाचाही अपमान होणार नाही, याची बोलताना काळजी त्यांनी घेतली पाहिजे. मराठी माणसामुळेच मुंबईला वैभव आहे. मराठी माणसांचं योगदान कोणालाही नाकारता येणार नाही. इतर राज्यातील, समाजातील लोक व्यवसायच करतात. मात्र मुंबईचं श्रेय कोणालाही घेता येणार नाही, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
"महाराष्ट्राच्या जडणघडणीत मराठी माणसाचं सर्वाधिक योगदान" #DevendraFadnavis#BhagatSinghKoshyari#BJPhttps://t.co/pX8lDhIt8q
— Lokmat (@lokmat) July 30, 2022