'मी ज्योतिषी नाही, संजय राऊतांबद्दल मी का बोलू?, ते त्यांनाच विचारा'; शरद पवारांनी स्पष्टच सांगितले!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 04:04 PM2022-07-29T16:04:58+5:302022-07-29T16:10:39+5:30
संजय राऊतांच्या दाव्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नाशिक- शिवसेना उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात दिवसेंदिवस पुढे जाताना दिसेल. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत. उद्धव ठाकरेंबद्दल द्वेष, तिरस्कार शिंदे गटातील आमदारांमध्ये दिसतोय. परंतु हा द्वेष, तिरस्कार महाराष्ट्राच्या जनतेच्या आणि शिवसैनिकांच्या मनात नाही. भावनेच्या भरात, काहींना फसवून शिंदे गटात सामील केलं आहे. त्यातील काही आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे भविष्यात पुन्हा महाराष्ट्रात सत्ताबदल होईल, असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊतांच्या या दाव्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकार पडेल निवडणुका लागतील हे सांगायला मी ज्योतिषी नाही. संजय राऊतांबद्दल मी का बोलू, त्यांनाच याबाबत विचारा,असं शरद पवार पत्रकारांना म्हणाले. निवडणुका कधीही लागल्या तरी आम्ही तयार आहोत, असंही शरद पवारांनी सांगितलं. तसेच नाही झाल्या, तरही राज्य कसं चाललंय यावर बारकाईने लक्ष ठेवू. जिथे कमतरता दिसेल, तिथे योग्य ती भूमिका घेऊ, असंही शरद पवार यांनी सांगितलं. नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते.
शरद पवारांनी ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर देखील भाष्य केलं. न्यायलयाने ओबीसी आरक्षणावर दिलेला निर्णय चिंताजनक आहे. यामुळे मोठा वर्ग नाराज होईल, हा वर्ग सत्तेबाहेर जातो की काय, अशी भीती याने निर्माण झाली आहे, असं शरद पवार म्हणाले. जवळपास एक महिना झाला राज्याला मंत्री नाही. राज्यात पूरपरिस्थिती असताना काम करण्यासाठी मंत्रिमंडळ टीम असणं आवश्यक आहे. विरोधी पक्ष नेते लोक संकटात आहे ते तिकडे भेटी देताय, यातून मुख्यमंत्र्यांनी बोध घ्यावा, असा टोलाही शरद पवारांनी लगावला.