राष्ट्रवादी-कॉँग्रेसचे नेते भाजपाच्या संपर्कात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 12:31 AM2017-09-03T00:31:21+5:302017-09-03T00:31:21+5:30
कॉँग्रेस व राष्टÑवादीचे अनेक मोठे नेते भाजपाच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. त्यामुळे लवकरच राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
नाशिक : कॉँग्रेस व राष्टÑवादीचे अनेक मोठे नेते भाजपाच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. त्यामुळे लवकरच राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
नाशिकला विश्रामगृहावर पत्रकारांशी चर्चा करताना त्यांनी ही माहिती दिली. पश्चिम महाराष्टÑात नुकतेच कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांनी जलसंपदा विभागाच्या एका कार्यक्रमात गिरीश
महाजन यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. पंचवीस वर्षे आपण मंत्री होतो, मात्र इतक्या वर्षात जलसंपदासाठी इतका निधी पश्चिम महाराष्टÑासाठी आला नाही, असे त्यांनी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर भाजपात प्रवेशाची चर्चा सुरू असलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे भाजपात कधी प्रवेश करणार, अन्य नेतेही स्तुतिसुमने उधळत आहेत, त्यांचाही प्रवेश आहे काय? असे विचारले असता गिरीश महाजन यांनी सांगितले की, पतंगराव कदम काय किंवा गणपतराव देशमुख काय, यांनी जे सत्य आहे, तेच सांगितले.
कधी नव्हे तो इतका निधी पश्चिम महाराष्टÑाला जलसंपदा विभागाकडून प्राप्त झाला. त्यामुळे ती स्तुती नव्हे तर चांगल्याला चांगले म्हणण्याची प्रथा आता सुरू झाली आहे. नारायण राणे, पतंगराव कदम, राधाकृष्ण विखे-पाटील हे भाजपात आल्यास नरेंद्र मोदीच्या कॉँग्रेसमुक्त भारताला ती मदतच होणार आहे. या नेत्यांचे भाजपात स्वागतच आहे. इतकेच नव्हे तर राज्यातील कॉँग्रेस व राष्टÑवादीचे अनेक मातब्बर नेते भाजपाच्या संपर्कात असून, ते लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोेट त्यांनी यावेळी केला.