राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यश मिळेना !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:20 AM2021-08-18T04:20:07+5:302021-08-18T04:20:07+5:30
संजय पाठक, नाशिक : महापालिकेची सहावी पंचवार्षिक निवडणूक आता होणार असताना यापूर्वी पाच पंचवार्षिक पंचवार्षिक निवडणुकीत प्रत्येक प्रस्थापित पक्षाने ...
संजय पाठक, नाशिक : महापालिकेची सहावी पंचवार्षिक निवडणूक आता होणार असताना यापूर्वी पाच पंचवार्षिक पंचवार्षिक निवडणुकीत प्रत्येक प्रस्थापित पक्षाने काहींना काही चमकदार कामगिरी करून महापौरपद पर्यायाने सत्ता प्राप्त करून घेतली आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकही महापौरपद पटकावले नाही.
आता राज्यात महाविकास आघाडी सत्तेवर असून, त्यामुळेच परिस्थिती अनुकूल असताना हा पक्ष नाशिक महापालिकेत सत्तास्थानी पोहोचेल काय याविषयी उत्सुकता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना १९९९ मध्ये झाली. त्यामुळे या पक्षाने २००२ मध्ये महापालिकेची पहिली पंचवार्षिक निवडणूक लढवली. पहिल्याच वर्षी या पक्षाला २३ जागा मिळाल्या. मात्र त्यावेळी काँग्रेस पक्षालाही अवघ्या १६ जागा मिळाल्या. त्यामुळे या दोन पक्षांची आघाडी झाली असती तरी सत्ता मिळविणे शक्य नव्हते. त्यातच शिवसेनेला ३८, तर भाजपाला २२ अशा एकूण ६० जागांवर विजय मिळाल्याने त्यांची सत्ता स्थापन होणे अटळ झाले. २००७ मध्ये झालेल्या निवडणुकीत १७ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसला विजय मिळाला. त्यामुळे सत्तेवर येण्याचा विषय नव्हता. पुढे २०१२ मध्ये झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला टार्गेट केले विशेषतः पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यावर त्यांनी गंभीर आरोप केले भुजबळ यांनी केला प्रत्युत्तर दिले असले तरी राज ठाकरे यांचा करिष्मा त्यावेळेस जोरात होता त्यामुळे मनसेला ४०, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला अवघ्या वीस जागांवर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे मनसेला सत्ता बहुमत मिळवणे सोपे नसतानाही राष्ट्रवादीला पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार निवडणुकीत तटस्थ राहावे लागले त्यामुळे मनसेच्या सत्ता संपादनाचा मार्ग मोकळा झाला २०१७ मध्ये भाजपाची लाट असल्याने शिवसेना वगळता सर्वच पक्षांचे पानिपत झालं काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचे प्रत्येकी सहा नगरसेवक निवडून आले, तर मनसेचे पाच नगरसेवक शिल्लक राहिले.
सिडकोसारख्या भागात राष्ट्रवादी अत्यंत क्षीण आहे. पंचवटी त्यापेक्षा वेगळी स्थिती नाही पूर्व आणि पश्चिम विभाग सोडला तर अन्य सर्व ठिकाणी पक्षांची अवस्था बिकट आहे असे महापालिकेच्या निकालानुसार दिसते.
मात्र, आता ही स्थिती सुधारण्याची संधी आहे त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष या निवडणुकीला कसा सामोरे जातो यावर आता पक्षाचे यशापयश अवलंबून आहे
इन्फो...
राष्ट्रवादी काँग्रेसची आतापर्यंतची कामगिरी
२००२ - २३
२००७ - १७
२०१२ - २०
२०१७ - ०६