राष्ट्रवादीकडून जिल्हा प्रशासनाला भाजीपाला ‘भेट
By admin | Published: May 27, 2017 12:36 AM2017-05-27T00:36:30+5:302017-05-27T00:36:41+5:30
राष्ट्रवादी जिल्हा कॉँग्रेसने शुुक्रवारी (दि. २६) जिल्हा प्रशासनाला कोबी, टमाट्यांसह शेतमाल भेट देत आंदोलन केले.
’लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : तीन वर्षांत एकही आश्वासन पूर्ण न करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा निषेध करीत राष्ट्रवादी जिल्हा कॉँग्रेसने शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी आत्महत्या करीत असल्याचा आरोप करीत शुुक्रवारी (दि. २६) जिल्हा प्रशासनाला कोबी, टमाट्यांसह शेतमाल भेट देत आंदोलन केले.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी भाजीपाला सोबत नेत तो जिल्हाधिकाऱ्यांना भेट देण्याची तयारी केली असताना, पोलिसांनी त्यांना अटकाव केल्यानंतर दीड तास राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ‘नही चलेगी, नही चलेगी, सरकार की दादागिरी नही चलेगी’ घोषणाबाजी केली. त्यानंतर पदाधिकाऱ्यांना भाजीपाल्यासह आत सोडण्यात आले.
केंद्र सरकारची तीन वर्षे होऊनदेखील जनतला अच्छे दिन आले नसल्याचे सांगत या सरकारने जनतेची घोर फसवणूक केल्याचा आरोप आंदोलनावेळी मनोेगत व्यक्त करताना जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार यांनी केला. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आधी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी डोक्यावर भाजीपाल्याच्या टोपल्या घेत भाजीपाला विक्रीचे आंदोलन केले. शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत कर्जमाफी दिली पाहिजे, शेतमालाला हमीभाव दिला पाहिजे, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना तत्काळ आर्थिक मदत केली पाहिजे, आगामी खरीप हंगामाच्या तोेंडावर जिल्हा बॅँकांना पतपुरवठा करून शेतकऱ्यांना खरिपासाठी तातडीचे कर्ज उपलब्ध करून दिले पाहिजे आदी मागण्या यावेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने करण्यात आल्या. या आंदोलनात माजी आमदार दिलीप बनकर, माजी जिल्हाध्यक्ष श्रीराम शेटे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंबळे, कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, अर्पणा खोसकर, डॉ. सयाजी गायकवाड, संजय बनकर, महेंद्रकुमार काले, हिरामण खोसकर, सिद्धार्थ वनारसे, यशवंत ढिकले, सुरेश कमानकर, सुनील वाजे, वैभव देवरे, दीपक वाघ, पुरुषोत्तम कडलग आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.