महापालिकेत एक प्रभागासाठी राष्ट्रवादी आग्रही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:17 AM2021-01-19T04:17:17+5:302021-01-19T04:17:17+5:30
नाशिक : नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तयारीला लागला असून, आगामी निवडणुकीत महापालिकेत बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी ...
नाशिक : नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तयारीला लागला असून, आगामी निवडणुकीत महापालिकेत बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी एक प्रभाग एक नगरसेवक असावा, असा आग्रह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी धरला आहे. या संदर्भात झालेल्या पक्षाच्या बैठकीत प्रभागाची रचना व निवडणूक तयारीवर चर्चा करण्यात आली. भाजपच्या बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे शहराचा विकास खुंटल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
राष्ट्रवादी भवन येथे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे, नानासाहेब महाले, दिलीप खैरे, अशोक सावंत, गजानन शेलार, बाळासाहेब कर्डक, निवृत्ती अरिंगळे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. नाशिक महानगरपालिका निवडणुकीला सव्वा वर्ष शिल्लक राहिले असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. पक्षाने प्रभागनिहाय बैठका पार पाडत शहरात वातावरण निर्मिती करून जनतेच्या नागरी समस्या जाणून घेतल्या आहेत. प्रभागनिहाय बैठकांमध्ये सर्व स्तरातून सिंगल वाॅर्ड अर्थात एक सदस्यीय प्रभाग रचनेची मागणी करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. मागील महापालिका निवडणुकीत सत्ताधारी भाजपने चार सदस्यीय प्रभाग रचना केल्यामुळे नाशिकचा विकास होऊ शकला नाही. प्रभागातील कामांमध्ये श्रेय मिळणार नाही तसेच सीमारेषेमुळे प्रभागात कामे झाली नाहीत. एक सदस्यीय प्रभाग रचनेत विकासकामे होतात. तसेच प्रभागात एकच नगरसेवक असल्याने नागरी समस्या सोडविण्यास वाव मिळत असल्याने नागरिकांच्या हितासाठी त्याचबरोबर पक्षाचे अधिकाधिक सदस्य निवडून आणण्यासाठी सिंगल वार्ड होणे गरजेचे असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. त्यासाठी शहरातील प्रमुख नेते हे पालकमंत्री छगन भुजबळ व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेणार असल्याचे बैठकीत ठरले. या बैठकीला संजय खैरनार, मनोहर कोरडे, मकरंद सोमवंशी, जीवन रायते, कुणाल बोरसे, मुजाहिद शेख, प्रशांत वाघ आदी उपस्थित होते. (फोटो १८ एनसीपी)