'तुमचं जेवढं आयुष्य, तेवढं शरद पवारांचं राजकारण'; छगन भुजबळांनी संजय राऊतांना सुनावलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2023 12:00 PM2023-05-08T12:00:28+5:302023-05-08T12:45:22+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे
नाशिक/मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते नक्कीच आहेत. त्यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान असला, तरी पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले, असा दावा सामना अग्रलेखातून केली आहे.
चारेक दिवसांपूर्वी निवृत्तीची घोषणा करताच पक्ष बुंध्यापासून हादरला व प्रत्येक जण आता आपले कसे होणार? या चिंतेने हादरून गेला. कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी मनधरणी केली व लोकभावनेचा आदर राखून पवार यांनी राजीनामा मागे घेतला व यापुढे तेच राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा सांभाळतील. त्यामुळे गेले चार-पाच दिवस सुरू असलेल्या नाटय़ावर पडदा पडला अशा शब्दात सामना अग्रलेखातून राष्ट्रवादीवर निशाणा साधण्यात आला आहे.
सामन्याच्या आजच्या अग्रलेखावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. शरद पवारांनी 'लोक माझे सांगाती' पुस्तकात जे म्हणाले होते, त्यावर उद्धव ठाकरे यांनी आधीच स्पष्टीकरण दिले आहे. मला महाविकास आघाडीत बिघाडी करायची नाही, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. मग संजय राऊत यांना हे सगळं उकरून काढायची काय गरज? त्यांना काय अडचण आहे?, राष्ट्रवादी महाविकास आघाडीमधून बाहेर पडायला हवी, असं त्यांना वाटतंय का?, असे सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केले.
तुमचं जेवढ आयुष्य आहे, तेवढं शरद पवारांचं राजकारण आहे, असं म्हणत छगन भुजबळ यांनी संजय राऊतांना सुनावलं. शिंदे गटावर लक्ष न दिल्यानं आज बाहेर बसण्याची वेळ आलीय. इतकं लक्ष त्यानी शिंदे ग्रुप आणि त्यांच्या बॅग वर ठेवले असते, तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती, असं देखील छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आगामी दिवसात राष्ट्रवादी विरुद्ध ठाकरे गट असा वाद रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, सामना अग्रलेखातून झालेल्या टीकेवर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी काही तो अग्रलेख वाचलेला नाही. सामना किंवा सामनाचे संपादक हे सर्व लोक आम्ही एकत्रित काम करतो. एकत्रित काम करत असताना पूर्ण माहिती घेऊनच त्यावर भाष्य करणे योग्य राहील, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसेच महाविकास आघाडीत सर्वकाही ठीक आहे. काळजी करू नका, असंही शरद पवारांनी म्हटलं आहे. सोलापूरमधील एका कार्यक्रमानिमित्त शरद पवार आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
सामनात नेमकं काय म्हटलंय?
नवा अध्यक्ष कोण असावा यासाठी एक भलीमोठी कार्यकारिणी पवार यांनी नेमली. त्या कार्यकारिणीत कोण? तर ज्यांनी भाजपात जाण्याचे संधान बांधले होते त्यातलेच बरेच जण होते. पण कार्यकर्त्यांचा रेटा असा व भावना अशा तीव्र की, त्या कार्यकारिणीस पवारांचा राजीनामा नामंजूर करून ‘यापुढे तुम्ही आणि तुम्हीच', असे पवारांना सांगावे लागले व तिसऱ्या अंकाची घंटा वाजण्याआधीच पवारांनी नाटकाचा पडदा पाडला. पवार यांच्या माघारीने त्यांच्या पक्षात चैतन्य आले तसे राष्ट्रीय पातळीवरील विरोधी पक्षांच्या आघाडीसही ‘हायसं’ वाटले. पवारांना मागे फिरण्याशिवाय पर्याय नव्हता हे खरे, पण या निमित्ताने आपला पक्ष नक्की कोठे आहे व आपल्याभोवती वावरणाऱ्यांची मने नेमकी कोठे फिरत आहेत, याचा अंदाज पवारांनी घेतला आहे असं सांगत ठाकरे गटाने अजित पवारांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.