शिंदेंचं जाऊदेत, फडणवीसांच्या शब्दाला दिल्लीत वजन आहे; प्रकल्प रोखू शकले असते- छगन भुजबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2022 05:20 PM2022-10-28T17:20:17+5:302022-10-28T17:29:21+5:30
माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.
वेदांता- फॉक्सकॉनपाठोपाठ आता नागपुरात साकारण्याचा प्रस्ताव असलेला संरक्षण क्षेत्रातील टाटा समूहाचा एअरबस प्रकल्पही गुजरातला गेला आहे. हा प्रकल्प नागपुरातील मिहानमध्ये साकारण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला होता. त्यासाठी, पाठपुरावा सुरू असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनीच यापूर्वी म्हटलं होतं. मात्र, आता हाही प्रकल्प गुजरातला गेल्याने शिंदे सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
टाटा समूहाचा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर पुन्हा एकदा विरोधक आक्रमक झाले आहेत. माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी देखील शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. एकापाठोपाठ एक प्रकल्प गुजरातला जात आहेत. महाराष्ट्र मधील युवकांनी काय करायचे? आरत्या करा, हनुमान चाळीसा पठण करा, दहीहंडी खेळा, असं छगन भुजबळांनी सांगितले. आज नाशिकमध्ये छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद बोलावली होती.
राज्यात सरकार कोणचंही असो...देवेंद्र फडणवीस माजी मुख्यमंत्री देखील आहेत. त्यांच्या शब्दाला दिल्लीत वजन आहे. एकनाथ शिंदे करु शकणार नाहीत. पण देवेंद्र फडवणीस हा प्रकल्प गुजरातला जाण्यापासून रोखू शकले असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे नेते म्हणून वागले पाहिजे, असा टोलाही छगन भुजबळ यांनी लगावला. तसेच दिल्लीत जे नेते काम करत आहेत, त्यांनी लक्ष घालायला हवे होते, असंही छगन भुजबळ यावेळी म्हणाले.
महाविकास आघाडीने काहीच केले नाही- उपमुख्यमंत्री
टाटा एअरबसचा प्रकल्प मिहानमध्ये उभारण्याच्या प्रस्तावाला हिरवा झेंडा मिळाला नव्हता. मात्र, आपण त्यासाठी बरेच प्रयत्न केले, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'लोकमत'शी बोलताना स्पष्ट केले. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने या प्रकल्पासाठी काहीच हालचाली केल्या नाहीत, असा आरोपही त्यांनी केला.
गडकरी यांनी टाटा सन्सच्या अध्यक्षांना लिहिले होते पत्र
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन यांना याच महिन्यात पत्र लिहिले होते. हा प्रकल्प नागपूर परिसरातील टाटा समूहाच्या विस्तारित योजनांसाठी उपयोगी ठरेल, असेही पत्रात नमूद केले होते. गडकरींनी टाटा समूहाशी असलेल्या संबंधांचा हवाला देत मिहानला टाटा समूहाचा विकास हब बनविण्याची विनंतीही केली होती.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"