शिक्षेच्या स्थगितीसाठी माणिकराव कोकाटे यांची धावपळ; दिलासा मिळणार की अडचणी वाढणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 13:08 IST2025-02-22T13:07:40+5:302025-02-22T13:08:00+5:30
कोकाटे बंधूंना दोषी धरत दोन वर्षांचा कारावास व प्रत्येकी ५० हजारांचा दंडाची शिक्षा गुरुवारी सुनावली. त्यामुळे कोकाटे यांच्या आमदारकीवर गंडांतर आले आहे.

शिक्षेच्या स्थगितीसाठी माणिकराव कोकाटे यांची धावपळ; दिलासा मिळणार की अडचणी वाढणार?
नाशिक : मुख्यमंत्री स्वेच्छाधिकार योजनेच्या दहा टक्के राखीव कोट्यातून सदनिका मिळवण्यासाठी खोटी माहिती दिल्याप्रकरणी दोन वर्षाच्या कारावासाची शिक्षा झालेले कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे हे सोमवारी जिल्हा सत्र न्यायालयात अपील दाखल करणार असून ते शिक्षेला आव्हान देणार आहेत.
कॉलेज रोडसारख्या उच्चभ्रू भागात एका अपार्टमेंटमध्ये चार सदनिका राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, त्यांचे बंधू आरोपी विजय कोकाटे यांनी घेतल्या होत्या. कोकाटे आणि त्यांच्या बंधूंनी या सदनिका घेण्यासाठी आपल्या नावावर कोणतेही घर किंवा जमीन नसल्याची खोटी माहिती दिल्याच्या तक्रारीवरून दाखल फौजदारी खटल्यात नाशिकच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती आर. सी. नरवाडिया यांनी कोकाटे बंधूंना दोषी धरत दोन वर्षांचा कारावास व प्रत्येकी ५० हजारांचा दंडाची शिक्षा गुरुवारी सुनावली. त्यामुळे कोकाटे यांच्या आमदारकीवर गंडांतर आले आहे.
नाशिकच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी कोकाटे यांना जामीन मंजूर केला असून त्यानंतर आता त्यांनी अपिल करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. मुळात कोकाटे यांच्या याच सदनिकांसंदर्भात दिवाणी दावा नाशिक येथील दिवाणी न्यायालयात देखील दाखल होता. त्यात कोकाटे बंधू यांच्यासह अन्य दोघांच्या बाजूने निकाल लागला होता. फौजदारी खटल्यात या आधी दिवाणी न्यायालयात कोकाटे यांच्या बाजूने निकाल लागल्याची बाजूच मांडण्यात आली नाही, असे कोकाटे यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. दिवाणी न्यायालयात कोकाटे यांच्यासह अन्य दोघे जण निर्दोष सुटले होते. त्याचे निकालपत्र अन्य दोघा आरोपींच्या वकिलांनी फौजदारी खटल्यात दाखल केले. मात्र, कोकाटे यांच्याकडून ते अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती आर. सी. नरवाडिया यांच्या समोर सादर करण्याचे राहून गेले. त्यामुळे ही शिक्षा झाल्याचे कोकाटे यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. सोमवारी अपील दाखल करताना त्यात दिवाणी न्यायालयाचे निकालपत्र जोडणार असल्याचेही सांगण्यात आले.