राष्ट्रवादीचे पदाधिकारीच मैदानात
By Admin | Published: January 26, 2017 12:48 AM2017-01-26T00:48:47+5:302017-01-26T00:49:02+5:30
प्रचारात वानवा : प्रदेश उपाध्यक्षांपासून ते जिल्हा कार्याध्यक्षही रिंगणात
नाशिक : मिनी मंत्रालयाच्या मैदानात कॉँग्रेस, शिवसेने पाठोपाठ राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्वत: उतरणार असल्याने राष्ट्रवादी कॉँग्रेसलाही प्रदेश पातळीवरून नेत्यांना प्रचारासाठी आयात करण्याची वेळ येण्याची चिन्हे आहेत.
राष्ट्रवादी कॉँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य डॉ. भारती पवार या स्वत:च मानूर (कळवण) गटातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी त्या उमराणे (देवळा) गटातून निवडून आल्या आहेत. आता मात्र त्यांच्या होमपिचवरून त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. प्रदेश उपाध्यक्ष असल्याने त्यांच्यावर साहजिकच नाशिकसह उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी असण्याची चिन्हे आहेत; मात्र तूर्तास त्या स्वत: मानूर (कळवण) गटातून निवडणुकीच्या रिंगणात असल्याने उत्तर महाराष्ट्र सोडाच त्यांना संपूर्ण नाशिक जिल्ह्णातील ७३ गटात फिरून राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या उमेदवारांसाठी चौकसभा आणि प्रचारसभा घेण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष विष्णूपंत म्हैसधुणे यांचीही पळसे (नाशिक) गटातून निवडणूक लढण्याची तयारी आहे. त्यामुळे त्यांनाही अन्य गटात निवडणुकीच्या प्रचारासाठी जाणे अवघड ठरण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक वाघ यांनीही उमराणे (देवळा) गटातून निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. तसे झाले तर दीपक वाघ यांच्यासाठी युवा कार्यकर्त्यांची फळी उमराणे गटातच अडकण्याची चर्चा आहे. माजी आमदार जर्नादन पाटील यांच्या स्नुषा कालिंदी पाटील यांनी राजापूर (येवला) गटातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. राष्ट्रवादीचेच माजी आमदार दिलीप बनकर यांच्या पत्नी मंदाकिनी बनकर किंवा त्यांचे पुतणे गणेश बनकर हे पालखेड गटातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने दिलीप बनकर पालखेडसह निफाडमध्येच अडकणार हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे स्थानिक तसेच प्रदेश पदाधिकारी स्वत:च निवडणूक रिंगणात उतरणार असल्याने राष्ट्रवादीला प्रचार व प्रसारासाठी कसरत करावी लागण्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)