गॅस सिलेंडरच्या दरात कपात न झाल्याने युवती राष्ट्रवादीची नाराजी; पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या प्रतिमेचे औक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2021 05:09 PM2021-11-05T17:09:15+5:302021-11-05T17:10:20+5:30
भाऊबीज निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या प्रतिमेचे औक्षण करत केले आंदोलन
नाशिक - केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवर लावण्यात आलेल्या एक्साइज करात तुटपुंजी कपात केली परंतु गॅस सिलेंडरचे दर जैसे थे असल्याने राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या शहराध्यक्षा सोनिया होळकर यांनी नाराजी व्यक्त करत भाऊबीज निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या प्रतिमेचे औक्षण करत केले आंदोलन केले. यावेळी जिल्हाध्यक्ष किशोरी खैरनार, ऐश्वर्या गायकवाड, दीपाली अरिंगळे, रिटा भक्कड, कल्याणी बच्छाव, काजल खैरनार, विद्या रिजल, कादंबरी वैष्णव आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मोदी सरकार डिझेलवर १० रुपये आणि पेट्रोलमध्ये ५ रुपये कर कपात करत पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. परंतु गॅस सिलेंडरच्या दरात कपात न केल्याने सर्वसामान्य जनतेचे बजेट कोलमडून निघाले आहे.
सततच्या इंधन दरवाढी मुळे सर्वसामान्य माणसांचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोल डीझेल व गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतीमुळे जनता केंद्र सरकारचा कडाडून विरोध करत आहे. या भीती पोटी आपण जनतेच्या बाजूने असल्याचे चित्र दाखविण्यासाठी पेट्रोल डिझेलच्या किमतीत तुटपुंजी कपात केली. परंतु यामागचे खरे कारण दादरा नगर हवेली पोटनिवडणुकीचा पराभव असून आलेल्या निकालानंतर केंद्र सरकार घाबरल्याने भीतीपोटी दर कपात केली आहे. पेट्रोल-डीझेलचे दर कमी करताना गॅस सिलेंडरच्या दराकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केल्याने भाऊबीजेनिमित्त त्यांना आठवण करून देण्यासाठी त्यांच्या प्रतिमेचे औक्षण करत उपहासात्मक आंदोलन करत असून भाऊबीजेनिमित्त तरी गॅस सिलेंडरचे दर कमी करावे युवती शहराध्यक्ष सोनिया होळकर यांनी यावेळी सांगितले.