राष्ट्रवादीच्या महिलांनी फुटपाथवर पेटविली चूल सिलिंडर, दरवाढीचा निषेध
By श्याम बागुल | Published: March 7, 2023 05:01 PM2023-03-07T17:01:29+5:302023-03-07T17:01:39+5:30
‘होळी रे होळी, सरकारने थापली गॅस दरवाढीची पोळी’ अशी घोषणाबाजी सरकारविरोधात केली.
नाशिक : केंद्र सरकारने घरगुती व व्यावसायिक वापराच्या सिलिंडरच्या दरात मोठी वाढ केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शहर महिला आघाडीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील फुटपाथवर चूल पेटवून सरकारच्या नावे शिमगा करण्यात आला. ‘होळी रे होळी, सरकारने थापली गॅस दरवाढीची पोळी’ अशी घोषणाबाजी सरकारविरोधात केली.
केंद्र सरकारने घरगुती गॅस तसेच व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केल्याने आता सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला झळ बसत आहे. त्यामुळे सामान्यांना जगणे कठीण झाले असून, रस्त्यावर खाद्यपदार्थ विक्रेत्यांना देखील सिलिंडरच्या किमतीमुळे व्यवसाय करणे अवघड झाले आहे. केंद्र सरकारने ही दरवाढ मागे घ्यावी यासाठी होळी सणाच्या मुहूर्तावर केंद्र सरकारच्या विरोधात शिमगा करण्यासाठी राष्ट्रवादी महिला आघाडीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गॅस दरवाढीचा निषेध नोंदविण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या फुटपाथवर महिला पदाधिकाऱ्यांकडून चूल मांडून चहादेखील बनविण्यात आला. केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत गॅस दरवाढीचे फलक दाखवून निषेध करण्यात आला. या आंदोलनात माजी नगरसेविका सुषमा पगारे, राणू पाटील, सुरेखा निमसे, कुंदा सहाणे, रोहिणी महाजन, संजीवनी शेवाळे, रुपाली तायडे, संगीता माळी, रुपाली पठारे, डॉ. प्रमिला पवार, विद्या बर्वे, निर्मला सावंत, दीप्ती हिरे, संगीता पाटील, संगीता सानप, सविता भामरे, मनीषा सोनवणे आदी महिला उपस्थित होत्या.