प्रचार-प्रसिद्धीत कॉँग्रेसची राष्ट्रवादीवर ‘आघाडी’
By admin | Published: August 14, 2014 09:50 PM2014-08-14T21:50:47+5:302014-08-15T00:34:13+5:30
प्रचार-प्रसिद्धीत कॉँग्रेसची राष्ट्रवादीवर ‘आघाडी’
नाशिक : राज्यातील कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडी सरकारचा पंधरा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या निमित्ताने व आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राज्याच्या जनसंपर्क विभागाने ‘नेतृत्वाचे सर्वसमावेशक निर्णय’ नावाची पुस्तिका प्रसिद्ध केली असून, राज्यातील प्रत्येक जिल्हा परिषदेला सुमारे हजार पुस्तिका स्थानिक ग्रामपंचायतींना वितरित करण्यासाठी पाठविल्या आहेत.
या पुस्तिकेत राज्यातील आघाडी सरकारने राबविलेल्या विविध योजनांची जंत्रीच रकमेसह दिली आहे. ५६ पानांच्या रंगीत पुस्तिकेत समतोल औद्योगिक विकास, कृषिविकास, गतिमान प्रशासन, राज्यातील नागरी ‘ई-गव्हर्नन्स’ प्रकल्प, बदलती शहरे, सर्वसमावेशक विकास, दुष्काळग्रस्त व आपत्तीग्रस्तांना मदतीचा हात, शिक्षणाच्या नव्या दिशा, आरोग्यसंपदा, संवर्धन पर्यावरण आणि संस्कृतीचे आदि टप्पे दर्शविण्यात आले आहे. या टप्प्यांद्वारे राज्यातील विकासाचा आलेखच सादर करण्यात आला आहे. मुखपृष्ठाच्या आतील पानात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची दोन महत्त्वाची छायाचित्रे असून, एका छायाचित्रात स्वित्झर्लंड येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या परिषदेला जाताना मुख्यमंत्री चव्हाण यांनी झ्युरिक विमानतळ कंपनीच्या अधिकाऱ्यांबरोबर केलेली चर्चा व दुसऱ्या छायाचित्रात ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांच्या भेटीचे छायाचित्र आहे.
त्याचबरोबर सदर माहिती पुस्तिकेत गारपीटग्रस्तांना मदत, दुष्काळग्रस्त भागांसाठी बांधण्या आलेले सीमेंट बंधारे, शेततळे यांच्यासह विविध उपाययोजनांची माहिती देण्यात आली असून,
राज्यातील जिल्हा परिषदांना सुमारे हजार पुस्तिकांचे वाटप करण्यात आले असून, जिल्हा परिषद स्तरावरून या पुस्तिका ग्रामपंचायतींना वाटप करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)