राष्ट्रवादीची अवस्था बिकट
By admin | Published: February 12, 2017 10:21 PM2017-02-12T22:21:01+5:302017-02-12T22:21:16+5:30
रामदास कदम : घोटी येथील जाहीर सभेत आरोप
घोटी : कॉँग्रेस व राष्ट्रवादीने आजपर्यंत फक्त मतांचे राजकारण करीत भ्रष्टाचार केला. त्यामुळे त्यांचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. आगामी काळात राष्ट्रवादीची अवस्था मनसेपेक्षाही वाईट असल्याचे भाकीत करत कॉँग्रेस-राष्ट्रवादीने भ्रष्टाचाराचा कळस केला असल्याचा आरोप पर्यावरण मंत्री व शिवसेना नेते रामदास कदम यांनी केला.
जिल्हा परिषद व पंचायत समतिीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गट व गणनिहाय इगतपुरी तालुक्यातील शिवसेनेच्या सर्व उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी कदम घोटी येथील भंडारदरा चौक येथील जाहीर सभेत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, उपजिल्हाप्रमुख तथा घोटी गटाचे उमेदवार निवृत्ती जाधव, माजी आमदार शिवराम झोले, काशिनाथ मेंगाळ, पांडुरंग बाबा गांगड यांच्यासह पंचायत समिती सभापती गोपाळ लहांगे, शिवसेना तालुकाप्रमुख भगवान आडोळे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबूलाल भोर, संघाचे चेअरमन ज्ञानेश्वर लहाने, किसान सेना प्रमुख मदन चोरडिया, माजी उपसभापती रघुनाथ तोकडे आदि व्यासपीठावर होते. यावेळी माजी आमदार शिवराम झोले, उमेदवारांच्या वतीने निवृत्ती जाधव, रघुनाथ तोकडे, नंदलाल
भागडे आदिंनी आपले मनोगत व्यक्त करून शिवसेनेच्या सर्व
उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले. यावेळी व्यासपीठावर उमेदवार निवृत्ती जाधव, सुशीला मेंगाळ, अनिता लहांगे, हरिदास लोहकरे, कावजी ठाकरे, विठ्ठल लंगडे, यांच्यासह गणातील सर्व उमेदवार व्यासपीठावर होते. याबरोबरच सूर्यकांत भागडे, विनोद भागडे, युवा सेनेचे मोहन बऱ्हे, बाळा गव्हाणे, देवीदास जाधव, संतोष दगडे, बाळासाहेब झोले, महिला आघाडीच्या लता जाधव, अंजनाताई जाधव, दीपक गायकवाड आदि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. (वार्ताहर)