राष्ट्रवादीकडून सिडकोत गांधीगिरी;आरोग्याचा प्रश्न : नागरिकांना मास्कचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 04:11 PM2018-10-03T16:11:13+5:302018-10-03T16:11:36+5:30
शहरात स्वाइन फ्लूसह साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी नाशिक महापालिकेतील आरोग्य विभाग अपयशी ठरला असून, स्वाइन फ्लूचे निर्मूलन करण्यासाठी महापालिका फक्त कागदी घोडे नाचवत आहे.
नाशिक : नाशिक महानगरपालिकेतील आरोग्य विभागाच्या उदासीनतेमुळे शहरात स्वाइन फ्लूने थैमान घातले असून, या रोगाला आळा घालण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सिडको विभागात नागरिकांना मास्कचे वाटप करून आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले.
शहरात स्वाइन फ्लूसह साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी नाशिक महापालिकेतील आरोग्य विभाग अपयशी ठरला असून, स्वाइन फ्लूचे निर्मूलन करण्यासाठी महापालिका फक्त कागदी घोडे नाचवत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसने महापालिकेतील आरोग्य विभागाला जाग आणण्यासाठी गांधीगिरी करीत शहरातील विविध भागात औषध फवारणी मोहीम राबविली आहे. परंतु अजूनही महापालिकेतील आरोग्य विभागाची झोप उडालेली नसून, आरोग्य विभाग ठोस पाऊल उचलताना दिसत नाही. शहरात दूषित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे व या दूषित पिण्याच्या पाण्यामुळेही मलेरियाच्या आजारासह चिकुणगुण्यासारख्या आजारांनी डोके वर काढल्याचा आरोपही राष्टÑवादी कॉँग्रेसने केला आहे.
नवरात्रोत्सव जवळ येत असून, नाशिकची ग्रामदेवता कालिका माता मंदिरात दरवर्षीप्रमाणे गर्दी होणार असून याकडेही महापालिका आरोग्य विभागाचे लक्ष नाही. महापालिकेने याकडे तातडीने लक्ष देण्याची आवश्यकता असून, नागरिकांना रोगराईपासून वाचविण्यासाठी महापालिका आरोग्य विभाग जागे होत नाही तोपर्यंत असेच सामाजिक आरोग्याचे उपक्रम राबविणार असल्याचे युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी सांगितले. याप्रसंगी अॅड. चिन्मय गाढे, अमोल नाईक, मुकेश शेवाळे, विशाल डोखे, हर्षल चव्हाण, संदीप चव्हाण, सुनील घुगे, विजय मटाले, हरीश महाजन, योगेश गांगुर्डे, मनोज हिरे, नीलेश सानप, अमोल तुपे आदी उपस्थित होते.