शिवसेनेपुढे राष्ट्रवादीचे कडवे आव्हान
By admin | Published: February 8, 2017 10:44 PM2017-02-08T22:44:14+5:302017-02-08T22:45:27+5:30
शिवसेनेपुढे राष्ट्रवादीचे कडवे आव्हान
भगवान गायकवाड दिंडोरी
खेडगाव गणावर सत्ता कायम राखण्यासाठी शिवसेना सरसावली असताना राष्ट्रवादीनेही पुन्हा वर्चस्व मिळविण्यासाठी कंबर कसली आहे. गेल्या वेळी सरळ झालेली लढत यंदा माकप व भाजपाच्या लढण्याच्या तयारीने बहुरंगी होण्याची चिन्हे असून, शिवसेनेपुढे जागा राखण्यासाठी राष्ट्रवादीच्या कडव्या आव्हानाला तोंड द्यावे लागणार आहे.
तालुक्यातील खेडगाव गण हा जणू सभापतींचा गण आहे. या गणातून आजपर्यंत पाच दिग्गज नेते सभापती झाले असून, त्यात राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते श्रीराम शेटे यांना तब्बल १४ वर्षे सभापतिपदाचा मान मिळाला. या गणावर त्यांच्या गटाचे दीर्घकाळ वर्चस्व राहिले. मात्र गेल्या निवडणुकीत शिवसेनेने धक्का देत हा गण ताब्यात घेतला.
या गणावर कॉँग्रेसचे व तद्नंतर राष्ट्रवादीने आपले वर्चस्व ठेवले होते. श्रीराम शेटे यांनी या गणावर आपले प्रभुत्व ठेवत तालुक्याचेही नेतृत्व केले. मात्र ९७ नंतर गण राखीव झाल्याने त्यांची संधी हुकली. असे असताना त्यांच्या गटाचे सदस्य सातत्याने निवडून आले. मात्र गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांचे समर्थक जयराम डोखळे यांना शिवसेनेत आणत डोखळे व कावळे गटाने एकत्र येत वेगळी खेळी खेळत शेटे यांना काटशह दिला. या गणात मागील वेळी शिवसेनेच्या छायाताई डोखळे या निवडून आल्या. यावेळी हा गण पुन्हा अनुसूचित जमातीसाठी राखीव झाला असून, पंचायत समितीचे सभापतिपदही या प्रवर्गासाठी राखीव झाल्याने भावी सभापती म्हणून येथील लढत रंगणार आहे. राष्ट्रवादीत इच्छुकांची संख्या मोठी होती. हा गण कायम राखण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील असून, राष्ट्रवादीचे कडवे आव्हान राहणार आहे. दोघांनीही खेडगाव येथील उमेदवार दिले, तर भाजपा व माकपने या गटात उमेदवारी दिली आहे. विकासकामांच्या जंत्रीवर येथील निवडणूक चुरशीची ठरत शेटे, डोखळे, कावळे गटाची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.