दिंडोरीत राष्ट्रवादीचा तालुका मेळावा
By admin | Published: January 25, 2017 12:18 AM2017-01-25T00:18:13+5:302017-01-25T00:18:31+5:30
दिंडोरीत राष्ट्रवादीचा तालुका मेळावा
दिंडोरी : जिल्हा परिषद व पंचायत समित्या निवडणुकांच्या तयारीसाठी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा येथील ईशान्येश्वर अभ्यासिकेत संपन्न झाला. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवड समितीचे अध्यक्ष श्रीराम शेटे होते. जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, आमदार नरहरी झिरवाळ, जिल्हा बँकेचे संचालक गणपतराव पाटील, बाजार समिती सभापती दत्तात्रेय पाटील, जि. प. उपाध्यक्ष प्रकाश वडजे, युवक जिल्हाध्यक्ष सचिन पिंगळे, निरीक्षक जगदीश पवार आदि व्यासपीठावर उपस्थित होते.
केंद्रात व राज्यात अच्छे दिनचे स्वप्न दाखवत सत्तेत आलेल्या शिवसेना-भाजपा युतीने शेतकरीविरोधी भूमिका घेतल्याने शेतकऱ्यांची पुरती वाताहत झाली असून, गेल्या वर्षी दुष्काळाने तर यंदा नोटाबंदीने शेतकरी कर्जबाजारी झाला, असल्याचे प्रतिपादन श्रीराम शेटे यांनी केले. आमदार नरहरी झिरवाळ यांनी सरकार ग्रामीण विभागात विकासाला निधी देत नसून आमदारांना भांडता तरी येते पण सत्तेतील आमदारांची सहनही होत नाही अन् सांगताही येत नाही अशी स्थिती झाल्याचे त्यांनी सांगितले. कार्यकर्त्यांनी अंतर्गत सर्व मतभेद विसरून एकदिलाने काम करत पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता आणावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रकाश वडजे, कृउबा सभापती दत्तात्रय पाटील, ज्येष्ठ नेते विश्वासराव देशमुख, विठ्ठल संधान आदिंची भाषणे झाली. तालुकाध्यक्ष भास्कर भगरे यांनी प्रास्ताविक, तर डॉ. योगेश गोसावी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. (वार्ताहर)