दोनवेळ पाणीपुरवठ्यास मनपा प्रशासनाचा नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 07:03 PM2017-09-29T19:03:27+5:302017-09-29T19:03:40+5:30
नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरण समूहात मुबलक पाणीसाठा असल्याने दोनवेळ पाणीपुरवठा करण्याची शिवसेनेने केलेली मागणी प्रशासनाने फेटाळून लावली आहे. सद्यस्थितीतील पाणी वितरण व्यवस्था सुरळीत असल्याचा दावा प्रशासकीय सूत्रांनी केला आहे.
यंदा गंगापूर धरणासह मध्यम प्रकल्पांमध्ये शंभर टक्के पाणीसाठा झालेला आहे. त्यामुळे, शहरात दोनवेळ पाणीपुरवठा करण्याची मागणी शिवसेनेने महापालिका आयुक्तांची भेट घेऊन केली होती. परंतु, सद्यस्थितीत शहरात एकवेळ सुरू असलेला पाणीपुरवठा योग्य असल्याचे समर्थन प्रशासनाने केले आहे. सद्यस्थितीत पंचवटी, नाशिकरोड तसेच पूर्व विभागातील काही भागांत दोनवेळ पाणीपुरवठा केला जात आहे, तर अन्यत्र एकवेळ पाणीपुरवठा होत आहे. सर्वसाधारणपणे दीड ते अडीच तास पाणीपुरवठ्याची वेळ आहे. शहरात १०९ जलकुंभ असून ते भरण्याकरिता लागणारा वेळ आणि वितरण व्यवस्थेकरिता आवश्यक असलेली साधनसामुग्री व मनुष्यबळ पाहता दोनवेळ पाणीपुरवठा करणे शक्यच नसल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. शहरात दोनवेळ पाणीपुरवठा केल्यास वितरण व्यवस्था विस्कळीत होऊन नागरिकांच्या तक्रारींमध्ये वाढ होण्याची भीतीही व्यक्त करण्यात आलेली आहे. महापालिकेकडे सद्यस्थितीत व्हॉल्व्हमनची संख्याही अपुरी आहे. अशा स्थितीत दोनवेळ पाणीपुरवठा अशक्य असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, शिवसेनेने दोनवेळ पाणीपुरवठ्याची मागणी केली असताना पक्षाचे नगरसेवक व माजी विरोधी पक्षनेता सुधाकर बडगुजर यांनी मात्र सिडको भागात दोनवेळ पाणीपुरवठा तांत्रिकदृष्ट्या होऊच शकत नसल्याचे स्पष्ट मत सिडको प्रभाग समिती सभेत व्यक्त केले आहे. त्यामुळे दोनवेळ पाणीपुरवठ्याच्या मागणीवरून सेनेतच मतप्रवाह असल्याचे दिसून आले आहे.