एनडीआरएफ देणार विद्यार्थ्यांना धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 05:00 PM2017-07-26T17:00:21+5:302017-07-26T18:52:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : नैसर्गिक आपत्तीपासून बचाव व मदत कार्य करणाºया राष्टÑीय आपत्ती व्यवस्थापन दलाकडून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात येणार आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाने त्याचे आयोजन केले असून, विशेष करून नदीकाठच्या गावांमधील विद्यार्थ्यांना या प्रशिक्षणात सामावून घेण्यात येणार आहे.
दरवर्षी पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीच्या घटना घडून त्यातून मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानीचे प्रसंग घडतात. नैसर्गिक आपत्ती रोखता येत नसली तरी त्यापासून बचाव करण्याचा प्रयत्न करता येणे शक्य आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे नैसर्गिक आपत्तीचे व्यवस्थापन करण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अवगत करण्यासाठी, त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी राष्टÑीय आपत्ती व्यवस्थापन पथकाची मदत घेण्याचे ठरविण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यासाठी पंधरा दिवस अशा प्रकारचे प्रशिक्षण देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन पथकाला पाचारण करण्यात येणार असून, त्यासाठी नदीकाठच्या गावांमधील महाविद्यालयीन युवकांना दोन दिवसांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणामुळे स्थानिक पातळीवरच प्रशिक्षित पथक तयार करण्यास हातभार लागणार आहे.