कोटमगाव परिसरात भातलागवडीची लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 01:18 IST2020-08-04T23:13:41+5:302020-08-05T01:18:29+5:30
एकलहरे : कोटमगाव (ता.नाशिक) परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात भातलागवड सुरू आहे. भातलागवडीसाठी नैसर्गिक पाऊस मुबलक प्रमाणात पडला नसला तरी येथील शेतकरी शेतात नदीचे पाणी साठवून, गाळ करून भाताची लागवड करीत आहेत.

कोटमगाव परिसरात भातलागवडीची लगबग
एकलहरे : कोटमगाव (ता.नाशिक) परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात भातलागवड सुरू आहे. भातलागवडीसाठी नैसर्गिक पाऊस मुबलक प्रमाणात पडला नसला तरी येथील शेतकरी शेतात नदीचे पाणी साठवून, गाळ करून भाताची लागवड करीत आहेत. दारणा नदी गावाजवळच असल्याने नदीचे पाणी थेट शेतात पाइपलाइन करून घेतले असल्याने शेतीला मुबलक पाणी मिळते. त्यामुळे भातलागवडीसाठी नैसर्गिक पावसाने ओढ दिली असली तरी पाइपलाइनद्वारे शेतात मुबलक पाणी सोडून गाळ केला जातो. ट्रॅक्टरच्या सहाय्याने गाळ मोकळा करून भाताची रोपे टोचन पद्धतीने लावली जातात. या भागात १००८ व इंद्रायणी भाताची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. भातलागवडीसाठी स्थानिक मजुरांची वानवा असल्याने पेठ, सुरगाणा भागातून मजूर आणून ठेका पद्धतीने काम करून घेतले जाते. काही शेतकरी ‘श्री’ पद्धतीने, तर काही पारंपरिक पद्धतीने भातलागवड करतात. त्यासाठी एप्रिल-मेमध्येच शेतीची मशागत करून खत मिसळून शेत तयार करून ठेवलेले असते. भातलागडीपूर्वी गादी वाफे तयार करून रोपे तयार केली जातात. रोपे वीस-पंचवीस दिवसांची झाल्यावर ती उपटून भातलागवड केली जाते.