जिल्ह्यात सुरळीत पार पडली ‘नीट’ परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 01:03 AM2020-09-14T01:03:34+5:302020-09-14T01:04:03+5:30
बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची असलेली नीट परीक्षा रविवारी जिल्ह्यातील ४४ केंद्रावर सुरळीत पार पडली. एकूण विद्यार्थ्यांपैकी ८८ टक्के विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली, तर १२ टक्के गैरहजर राहिले. रात्री उशिरा पेपर मुंबईकडे रवाना करण्यात आले.
नाशिक : बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची असलेली नीट परीक्षा रविवारी जिल्ह्यातील ४४ केंद्रावर सुरळीत पार पडली. एकूण विद्यार्थ्यांपैकी ८८ टक्के विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली, तर १२ टक्के गैरहजर राहिले. रात्री उशिरा पेपर मुंबईकडे रवाना करण्यात आले.
बारावीनंतर पुढील करिअर निवडण्यासाठी विद्यार्थ्यांना नीट परीक्षा महत्त्वाची मानली जाते. यंदा बारावीचा निकाल लागून बराच कालावधी उलटून गेल्यावरही कोरोनामुळे ही परीक्षा होण्याबाबत विद्यार्थी, पालकांमध्ये शंका होती. परंतु विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ही परीक्षा वेगवेगळ्या सत्रा मध्ये घेण्याचे ठरले.
त्यानुसार जिल्ह्यातील सुमारे २0 हजार विद्यार्थ्यांसाठी ४४ केंद्र ठेवण्यात आले होते. दुपारी २ वाजता प्रत्यक्ष पेपर असला तरी, परीक्षा केंद्रावर गर्दी टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना सकाळी ११ वाजेपासून टाइम स्लॉट देण्यात आला होता. प्रत्येकी ५0 याप्रमाणे विद्यार्थ्यांचे गट करण्यात आले, त्यामुळे साडेदहा वाजेपासून विद्यार्थी व पालकांची केंद्रावर गर्दी झाली. केंद्राच्या बाहेर मुले व मुली त्यांची स्वतंत्र रांग लावून, त्यात ६ फुटाचे अंतर ठेवण्यात आले होते. गेटवरच विद्यार्थ्यांचे ओळखपत्र तपासून आत पाठविले जात होते, विद्यार्थ्यांना पेन, पॅड, मोबाइल अन्य वस्तू नेण्यास मनाई असल्याने गेटवरच वस्तू काढून घेण्यात आले. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शासनाने पेन व मास्क पुरविले तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांचे हँडसॅनिटाझर करण्यात आले. प्रत्येक वर्गात फक्त १२ विद्यार्थ्यांची सोय करण्यात येऊन दोन पर्यवेक्षक नेमण्यात आले होते.
जिल्ह्यातील सर्व पेपर रात्री उशिरापर्यंत गोळा करण्याचे काम सुरू होते. पेपर गोळा केल्यानंतर ते लगेच मुंबई व तेथून विमानाने दिल्ली येथे पाठविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पालक केंद्राबाहेरच
दुपारी २ वाजता केंद्राचे गेट बंद करण्यात आले. बाहेर गावातून परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी केंद्राबाहेर वेळ घालविला. या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या पैकी ८८ टक्के विद्यार्थी परीक्षेला हजर होते. ५ वाजता पेपर सुटल्यावर सर्वच केंद्रावर पुन्हा गर्दी झाली.