सायकलिंगसाठी हव्यात सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 11:47 PM2020-09-07T23:47:28+5:302020-09-08T01:25:10+5:30
नाशिक : शहरात सायकलिंगला पोषक वातावरण असले तरी तो अजून वाढावा, यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, असे मत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी इंडिया सायकल्स फॉर चेंज चॅलेंजच्या आनुषंगाने आयोजित वेबिनारमध्ये व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शहरात सायकलिंगला पोषक वातावरण असले तरी तो अजून वाढावा, यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, असे मत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी इंडिया सायकल्स फॉर चेंज चॅलेंजच्या आनुषंगाने आयोजित वेबिनारमध्ये व्यक्त केले. नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर कामगार वर्ग आणि हौशी सायकलिस्ट्स सायकल चालवतात. त्यांचा विचार करता औद्योगिक क्षेत्रातदेखील सायकल ट्रॅक वाढविण्याची अपेक्षाही या वेबिनारमध्ये व्यक्त करण्यात आली.
केंद्र शासनाने इंडिया सायकल्स फॉर चॅलेंज अभियान सुरू केले आहे, त्याअंतर्गत नाशिकमध्ये सायकलसाठी पायाभूत सुविधा देण्याचे नियोजन आहे. त्यासंदर्भात हे वेबिनार आयोजित करण्यात आले होते. त्र्यंबक नाका ते पपाया नर्सरी व पपाया नर्सरी ते त्र्यंबक नाका हा एकूण १३ किमीचा पॉप अप सायकल ट्रॅक प्रस्तावित असल्याचे यावेळी स्मार्ट सिटीचे प्रकल्प व्यवस्थापक निखिल भोईर यांनी सांगितले. कामगार वर्गाचा विचार करता सदर पॉप अप सायकल ट्रॅक पुढे एमआयडीसीमध्ये नेणे गरजेचे असल्याचे निमाचे अध्यक्ष शशिकांत जाधव यांनी यावेळी सांगितले. त्याचा कामगार वर्गाला मोठ्या प्रमाणात फायदा होईल, असेही ते म्हणाले. नाशिकमध्ये सायकलिस्ट्सची संख्या मोठी असून, त्यादृष्टीने फोकस करणे गरजेचे असून त्यासाठी सर्व संघटना मदत करण्यास तयार असल्याचे चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी सांगितले. तसेच डॉ. विलास पाटील, डॉ. ढाके यांनी भविष्याचा विचार करून त्याप्रमाणे सायकलिंगच्या दृष्टीने शहरातील विविध भागांमध्ये पॉप अप सायकल ट्रॅक, स्लो झोन अशा सुविधा देण्याच्या सूचना केल्या.