निसर्गाशी सम्यक व्यवहाराची आवश्यकता : राष्ट्रपती रामनाथ कोविंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 01:49 AM2018-10-23T01:49:58+5:302018-10-23T01:51:09+5:30
मानवजात आपल्या गरजांसाठी निसर्गाशी छेडछाड करत आहे. साधन संपत्तीचा अंदाधुंद उपभोग घेतला जात आहे. त्यामुळे प्रदूषणात वाढ होत आहे. या अनिष्ठ परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी केवळ माणूस आणि प्राण्यांशीच नव्हे तर निसर्गाशीही सम्यक व्यवहार करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भगवान ऋषभदेव १०८ फूट मूर्तिनिर्माण कमिटीच्या वतीने आयोजित विश्वशांती अहिंसा संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना केले.
ऋषभदेवपूरम, मांगीतुंगी : मानवजात आपल्या गरजांसाठी निसर्गाशी छेडछाड करत आहे. साधन संपत्तीचा अंदाधुंद उपभोग घेतला जात आहे. त्यामुळे प्रदूषणात वाढ होत आहे. या अनिष्ठ परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी केवळ माणूस आणि प्राण्यांशीच नव्हे तर निसर्गाशीही सम्यक व्यवहार करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भगवान ऋषभदेव १०८ फूट मूर्तिनिर्माण कमिटीच्या वतीने आयोजित विश्वशांती अहिंसा संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना केले. मांगीतुंगी, ता. सटाणा येथील ऋषभदेवपूरममध्ये आयोजित सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, राष्ट्रपतींच्या पत्नी सौ. सविता कोविंद यांच्यासह गणिनीप्रमुख ज्ञानमती माताजी, आर्यिकारत्न चंदनामती माताजी, पीठाधीश रवींद्रकीर्ती स्वामी, वाशिमचे आमदार राजन पाटणी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भगवान ऋषभदेव यांच्या पावन प्रतिमेच्या सान्निध्यात आयोजित विश्वशांती अहिंसा संमेलनाला उपस्थित राहण्याची संधी मिळाल्याबद्दल प्रसन्नता व्यक्त करत सांगितले, महाराष्ट्र ही सामाजिक समरसता, अध्यात्म आणि सद्भावना यांची भूमी आहे. या भूमीतील अनेक विभूतींनी देशाला सामाजिक सौहार्द आणि देशप्रेमाचा संदेश दिलेला आहे. मानव कल्याणासाठी असलेल्या जैन परंपरेत ‘अहिंसा परमो धर्म:’चा सिद्धांत प्रतिष्ठित आहे. कोणाला मारू नये हाच केवळ अहिंसेचा अर्थ नाही, तर मन, शरीर आणि आचरणाच्या माध्यमातूनही कोणालाही दु:ख दिले जाऊ नये. आपल्या विचार, वाणी आणि व्यवहारातही कोणत्याही प्रकारच्या हिंसेला स्थान नसावे. अहिंसा आणि करुणा एकसाथ चालत असतात. करुणाभाव असल्याशिवाय अहिंसा धर्माचे पालन होऊ शकत नाही, असेही राष्ट्रपतींनी ठामपणे सांगितले.
राष्ट्रपतींनी जैन परंपरेबद्दल गौरवोद्गार काढताना सांगितले, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक आचरण ही तीन रत्ने जैन परंपरेत आहेत. तीर्थंकरांनी धर्माला पूजा-पाठ यातून बाहेर काढत त्याला व्यवहार आणि आचरणात आणण्याचा मार्ग दाखवला. मानवाच्याप्रति करुणावान आणि संवेदनशील राहणे हाच धर्म होय. जगभरात धर्माच्या नावावर होणारी हिंसा थांबविण्यासाठी आज याच शिकवणुकीची गरज असल्याचेही राष्ट्रपतींनी सांगितले. भारत हा अनादिकाळापासून अहिंसा आणि शांतीचा प्रणेता राहिलेला आहे. येथे सर्व धर्मांना सर्वोच्च स्थान दिले गेले आणि शांतीच्या स्थापनेसाठी मैत्री, संतुलन आणि सहिष्णुतेचा मार्ग सुचविलेला आहे. पशु-पक्षी आणि निसर्गाबरोबर हिंसा नको. नद्यांनाही स्वच्छ ठेवले पाहिजे. भारताने अहिंसेला नेहमीच मानवी व्यवहाराच्या केंद्रस्थानी ठेवले आहे, असे सांगून राष्ट्रपतींनी भारत सरकारमार्फत राबविले जाणारे उपक्रम व विविध योजना त्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरले असल्याचे स्पष्ट केले. महात्मा गांधीही अहिंसा आणि शांतीचे प्रबळ अनुयायी होते. जैन परंपरेसह भारताच्या सनातन परंपरेतही अहिंसा भाव प्रतिभीत आहे. गांधीजींनी आपल्या राजनीतीत आणि सामाजिक आंदोलनात त्याचा प्रभावी वापर केला. अहिंसेचे पुजारी म. गांधी यांचीही १५०वी जयंती साजरी केली जात असल्याचा उल्लेख यावेळी राष्ट्रपतींनी आवर्जून केला. दरम्यान, राष्ट्रपतींनी गणिनीप्रमुख श्री ज्ञानमती माताजी यांच्या ८५व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आणि त्यांना दीर्घायुष्य चिंतिले. दरम्यान, चित्रफितीद्वारे भगवान ऋषभदेव मूर्तिनिर्माण कार्याची माहिती मान्यवरांना देण्यात आली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे स्वागत पीठाधीश रवींद्रकीर्ती स्वामी यांनी, तर सौ. सविता कोविंद यांचे स्वागत अनिलकुमार जैन यांनी केले. याशिवाय उपस्थित मान्यवरांचे स्वागत सी. आर. पाटील, संजय पापडीवाल, प्रमोद कासलीवाल यांनी केले. सोहळ्याचे सूत्रसंचालन डॉ. जीवन प्रकाश जैन आणि विजय जैन यांनी केले.
अहिंसा हाच धर्म : ज्ञानमती माताजी
गणिनीप्रमुख श्री ज्ञानमती माताजी यांनी आशीर्वचन देताना सांगितले, राष्ट्रपतींच्या उपस्थितीमुळे आजचा दिवस संस्मरणीय बनला आहे. अहिंसा हाच धर्म आहे. जेथे अहिंसा तेथे समृद्धी असते. भारत देशाने अहिंसा, सत्य, अपरिग्रह अनेकांत या मार्गावर चालल्यास शांती प्रस्थापित होऊ शकेल. साऱ्या विश्वाचे कल्याण व्हावे, ही भावना तीर्थंकरांची होती. तोच संदेश घेऊन देश पुढे जाईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
त्रिवेणी संगम : चंदनामती माताजी
आयिकारत्न चंदनामती माताजी यांनी मार्गदर्शन करताना आज सर्वोच्च प्रतिमा, सर्वोच्च साध्वी आणि सर्वोच्च नागरिक असा त्रिवेणी संगम झाल्याचे सांगितले. शांती आणि अहिंसा हे एकमेकांना पूरक आहे. अहिंसा ही विश्वशांतीची पुंजी आहे. प्रेम, दया, मैत्री, करुणा यांचे पर्यायी नाव अहिंसा असल्याचेही त्यांनी सांगितले.
विश्वाला अहिंसेची गरज : डॉ. भामरे
संमेलनाचे अध्यक्ष केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी सांगितले, अहिंसेबाबत जैन धर्माने सूक्ष्म परिभाषा सांगितली आहे. अहिंसेतूनच शांती प्रस्थापित होते. संपूर्ण विश्वाला अहिंसेची गरज आहे. दोन माणसे आणि दोन देशांमध्ये अहंकारामुळे वाद उत्पन्न होतात. या अहंकारावर नियंत्रण मिळविणे गरजेचे आहे. सरकारने मांगीतुंगी या आदिवासीबहुल परिसराचा विकास करण्याची मागणीही डॉ. भामरे यांनी यावेळी बोलताना केली.
पर्यटनस्थळ व्हावे : रवींद्रकीर्ती स्वामी
मूर्तिनिर्माण कमिटीचे पीठाधीश रवींद्रकिर्ती स्वामी यांनी १०८ फुटी भगवान ऋषभदेव यांच्या मूर्तिनिर्माण कार्याची माहिती देत मांगीतुंगी परिसर एक पर्यटनस्थळ विकसित करण्याची मागणी केली. महामस्तकाभिषेक सोहळ्याप्रसंगी महाराष्ट्र सरकारने मदत केल्याबद्दल कृतज्ञताही त्यांनी व्यक्त केली. त्यावेळी परिसर विकासासाठी २७५ कोटींची योजना जाहीर केली होती; परंतु त्यात ३० ते ४० कोटी रुपयांचीच कामे झाली. इतर योजना अजूनही प्रलंबित आहे. त्यांची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी रवींद्रकीर्ती स्वामी यांनी केली.
आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान
मूर्तिनिर्माण कमिटीच्या वतीने भगवान ऋषभदेव इंटरनॅशनल अवॉर्ड मुरादाबाद येथील तीर्थंकर महावीर विश्वविद्यालयास प्रदान करण्यात आला. विश्वविद्यालयाचे कुलाधिपती सुरेश जैन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुरस्काराचा स्वीकार केला. ११ लाख रुपये रोख आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. कमिटीच्या वतीने दर सहा वर्षांनी हा पुरस्कार दिला जाणार आहे.
अहिंसा तत्त्व जपण्याची गरज : मुख्यमंत्री
मानवाची मानवाप्रतीचीच हिंसा नव्हे तर निसर्गाप्रतिची हिंसादेखील वर्ज्य मानण्याची शिकवण जैन तत्त्वाने दिली आहे. व्यक्ती, जीव जंतू व निसर्गाच्या विरोधातही हिंसा न करण्याची भूमिका घेऊन अहिंसा तत्त्व जपण्याची आज गरज असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. जगावर ओढवलेल्या वैश्विक तपमानवाढीच्या संकटाला मनुष्याचा हव्यास कारणीभूत ठरत असून, निसर्गासोबत मैत्रीपूर्ण संबंध गरजेचे आहेत तसेच मानवाने भोग बाजूला ठेवून त्यागाच्या मार्गाने आचरण करावे असेही ते म्हणाले. मांगीतुंगीच्या विकासासाठी मंजूर निधीमधून विकास कामे पूर्ण केली जातील तसेच मुंबईमध्ये उभारावयाच्या विश्वशांती भवनाच्या जागेचा प्रश्नही लवकरच मार्गी लागेल असे आश्वासनही त्यांनी शेवटी दिले.