प्रगतीसाठी जाती-जातीमध्ये आपुलकीची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 12:28 AM2018-10-19T00:28:35+5:302018-10-19T00:31:05+5:30
नाशिक : देशाच्या विकासासाठी जाती-जातीमध्ये आपुलकीची भावना निर्माण होण्याची गरज आहे. तसेच आंतरजातीय विवाहाचे प्रमाणही वाढले पाहिजे. शिक्षणाचे प्रमाण ...
नाशिक : देशाच्या विकासासाठी जाती-जातीमध्ये आपुलकीची भावना निर्माण होण्याची गरज आहे. तसेच आंतरजातीय विवाहाचे प्रमाणही वाढले पाहिजे. शिक्षणाचे प्रमाण वाढले तरी जातीभेद कमी झालेले नाहीत, अशी खंत ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी व्यक्त केली.
रावसाहेब थोरात सभागृहात शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव लिखित ‘अंधारातून उजेडाकडे’ या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्यात कसबे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे होते. यावेळी कसबे म्हणाले की, जाती-जातीमधील वाढती दरी ही देशाच्या विकासासाठी मारक ठरणारी आहे. देशाला प्रगतिपथावर नेण्यासाठी सर्व जातीतील समाज बांधवांनी सर्वच समस्यांचा एकजुटीने सामना करण्याची गरज आहे. याप्रसंगी आमदार डॉ. सुधीर तांबे व मविप्र सरचिटणीस नीलिमा पवार यांनी रामचंद्र जाधव यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार किशोर दराडे, आमदार बाळासाहेब सानप, शिक्षण संचालक सुनील चव्हाण, सहसंचालक दिनकर टेमकर, मनपा स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके, नाएसोचे अध्यक्ष सूर्यकांत रहाळकर आदी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते अंधारातून उजेडाकडे पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. रत्नाकर अहिरे यांनी प्रास्ताविक केले. चंद्रकांत गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास एसएससी बोर्डाचे अध्यक्ष किशोर पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी नितीन उपासनी, एम. व्ही. कदम, प्रवीण अहिरे, पुष्पा पाटील, सचिन पिंगळे, प्रकाश आंधळे, एस. बी. देशमुख आदी उपस्थित होते.