अमृततुल्य, प्रेमाचा चहा आता इम्युनिटी बुस्टर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:31 AM2020-12-15T04:31:51+5:302020-12-15T04:31:51+5:30
फार पूर्वी म्हणजे जुन्या काळात नाशिककरांचा हक्काचा चहा म्हणजे भगवंतराव! त्यानंतर समाधानदेखील असेच परिचित होते. नंतर शहर विस्तारले तसे ...
फार पूर्वी म्हणजे जुन्या काळात नाशिककरांचा हक्काचा चहा म्हणजे भगवंतराव! त्यानंतर समाधानदेखील असेच परिचित होते. नंतर शहर विस्तारले तसे चहाचे गुणगाण सर्वत्रच वाढत गेले आणि त्या त्या भागात अनेक चहाची दुकाने फेमस झाली. कॉलेज रोडसाठी सलीमची टपरी हे देखील आवडीचेच नव्हे तर आठवणीतले ठिकाण! आर्कुटसारखा सोशल मीडिया सुरू झाल्यानंतर सलीम चहाचीदेखील कम्युनिटी तयार झाली होती. आजही हा चहा असला तरी अशाच प्रकारे कॅनडा कॉर्नरवरील शर्माजींचा आल्याचा चहादेखील आजही टिकून आहे. गेल्या काही वर्षात नाशिकमध्ये गल्लोगल्ली मिसळींचे पेव फुटले. आता चहाच्या बाबतीतदेखील तसेच झाले आहे. येवले, अमृततुल्य, आठवणीतील चहा, प्रेमाचा चहा अशा नावाने अनेक दुकाने सुरू झाले आहेत. दिवसभर काम करताना एक ब्रेक चहाबरोबरच घ्यायचा आणि तोही स्नेहीजनांसमवेत ही आता लाइफस्टाइल बनत चालली आहे. दिवस थंडीचे असो, पावसाळ्याचे अथवा उन्हाळ्याचे चहा नव्हे तर अमृतपान करण्याची संधी कोणी सोडत नाही.
चहाचे मार्केट वाढले तसे चवीचे प्रकार बदलत गेले. आरोग्य सजग प्रकारदेखील वाढत गेले. कोरा चहा (ब्लॅक टी), लेमन टी असे रुचीनुसार प्रकार सुरू आहेत. त्याही पलीकडे गुलाबी चहा, आइस टी तर आहेच; परंतु आता तुळशी आणि आवळा असलेल्या हर्बल टी, ग्रीन टीलासुध्दा प्रतिसाद मिळत असल्याने उत्पादक कंपन्यांनीदेखील त्याची दखल घेऊन प्रॉडक्ट बाजारात आणले आहेत. सध्या कोरोनामुळे इम्युनिटी बुस्टर म्हणूनदेखील मार्केटिंग केले जात आहे.
इन्फो.
अनेक शासकीय कार्यालयांमध्ये चहाऐवजी आता अशाप्रकारचे चहांचे प्रकार आस्वादासाठी मिळतात. काही जण तर चक्क काढेच देत असून, सध्या कोरोना काळात तर असेच काढेच अधिक भाव खात आहेत.
इन्फो...
आंतरराष्ट्रीय चहा दिन २१ मे असला तरी अनेक चहा उत्पादक देश मात्र १५ डिसेंबर हाच चहा दिन साजरा करतात. चहाचे माहात्म्य वाढत असून, त्यावर अनेक सोशल मीडियाच्या मॉर्निंग पोस्टवरही सकाळी-सकाळी वाफाळता चहा दिसतोच.