विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेची आवड निर्माण करण्याची गरज : सचीन जोशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 12:12 AM2020-01-12T00:12:26+5:302020-01-12T00:23:54+5:30
शालेय विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेविषयी आवड निर्माण होत नसल्याने मराठी भाषा सक्ती करावी लागत आहे. मराठी भाषेविषयी विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण झाल्यास विद्यार्थी स्वयंप्रेरणेने मराठीकडे वळतील आणि सक्ती करण्याची गरजच उरणार नाही असे मत शिक्षण शास्त्राचे अभ्यासक सचीन जोशी यांनी व्यक्त केले आहे.
नाशिक : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील विविध माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य करण्याची घोषणा केल्यानंतर पुन्हा एकदा मराठी भाषा सक्तीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सध्यस्थितीत इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये आठवीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य आहे. परंतु, विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेविषयी विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण करण्यासाठी कोणतेही प्रयत्न होत नाही. त्यामुळे मराठी सक्ती करताना प्रथम विद्यार्थ्यांमध्येमराठी भाषेविषयी आवड निर्माण करण्याची गरज असल्याचे मत शिक्षण शास्त्राचे अभ्यासक सचीन जोशी यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केले आहे.
प्रश्न- इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकविली जाण्यासाठी सक्तीच का करावी लागते ?
जोशी : इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकविली जातच नाही असे नाही, शाळांना मान्यता देतानाच आठवीपर्यंत मराठी अनिवार्य केली आहे. त्यानुसार मराठी भाषा शिकविली जाते. परंतु, इंग्रजी शाळा प्राधान्याने इंग्रजी शिक्षणासाठीच सुरू झाल्याने इंग्रजीला प्राधान्यक्रम दिला जातो. पालकांचीही तशीच इच्छा असते. त्यामुळे मराठी भाषेविषयी विद्यार्थ्यांनाही गोडी निर्माण होत नाही. परिणामी विद्यार्थी, पालक आणि शाळाही मराठीपासून दुरावत असल्याने अशा अशाप्रकारे सक्ती केली जाते. परंतु अशा प्रकारे सक्ती करताना विद्यार्थ्यांमध्ये भाषेची आवड निर्माण होण्यासाठीही प्रयत्न होणे आवश्यक आहे.
प्रश्न -विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेविषयी गोडी निर्माण करण्यासाठी काय करता येईल असे वाटते ?
जोशी : शासनाकडून मराठी भाषा सक्तीसाठी घोषणा होतात. त्यासंदर्भात वेगवेगळे नियमही घालून दिले जातात. परंतु मराठी भाषेची विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण होण्यासाठी प्रयत्न केले जाताना दिसत नाही. महापालिके च्या मराठी माध्यमाच्या शाळांमधीव विद्यार्थ्यांचे मराठी चांगले असते.कारण त्यांना मराठीतील विविध गोष्टी ऐकायला वाचायला मिळतात. परंतु अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषेतील साहित्यच उपलब्ध नसल्याने विद्यार्थी मराठी वाचणे शिकत असले तरी त्यांचे लेखन व शब्दसंग्रह वाढू शकत नाही. त्यामुळे खासगी शाळांमध्येही मराठी साहित्य उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. पालकांनी मुलांना मराठीतील साहित्य उपलब्ध करून देतानाच पालक, शिक्षक समाज आणि शासन अशा सर्व घटकांनी मराठी भाषेसाठी पोषक वातावरण निर्मीती करण्याची गरज आहे.
प्रश्न-मराठी भाषेला पोषक वातावरण निर्मितीसाठी शासनस्तरावर काय प्रयत्न होणे अपेक्षित आहे?
जोशी : विद्यार्थ्यांचे मराठी विषयी प्रेम वाढविण्यासाठी त्यांना साहित्यसंपदा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. त्यासाठी बाल साहित्यिकांचा पुरस्कार निवडण्यासाठी शाले विद्यार्थ्यांचा अभिप्राय केंद्र स्थानी ठेवून निवड पद्धती राबवायला हवी. नामांकन मिळालेल्या साहित्यिकाची पुस्तके शालेय विद्यार्थ्यांना वाचनासाठी देऊन त्यांच्याकडून अभिप्राय मागवून त्यानुसार पुरस्कार दिले गेले तर ओघानेच विद्यार्थ्यांचे वाचनही वाढेल. त्याचप्रमाणे मराठी भाषा शिकविण्यासाठी उत्कृष्ठ शिक्षक तयार केले पाहिजे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्येही आठवीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य आहे. त्यामुळे या शाळांमधील मुलांचे मराठी कसे आहेत ते जाणून घेण्यासाठी सरल पोर्टल विद्यार्थ्यांचे मराठी भाषा परीक्षेती गुण टाकणे अनिवार्य करण्यासोबतच इंग्रजी माध्यमात शिक्षण घेताना मराठी भाषेत गुणवत्ता सिद्ध करणाºया विद्यार्थ्यांचे विशेष कौतूक करणे आवश्यक आहे. त्यातून आपोआपच विद्यर्थ्यांमध्ये मराठी भाषेविषयी गोडी व आकर्षण निर्माण होईल. आणि एकदा की विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेची गोडी निर्माण होऊन ते स्वयंप्रेरणेने मराठीकडे वळतील.