समाजात वाचन संस्कृती रुजविण्याची गरज, कुलगुरू इ. वायुनंदन यांचे प्रतिपादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 06:48 PM2018-01-15T18:48:15+5:302018-01-15T20:16:32+5:30
ग्रंथ किंवा पुस्तके माणूस घडविण्याचे काम करतात. ग्रंथांमुळे माणसे सुसंस्कृत, प्रगल्भ होतात. देश भौतिकदृष्टया कितीही विकसित असला तरी तो सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून किती विकसित आहे, हे महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे ग्रंथ चळवळ तसेच वाचन संस्कृती आता घराघरात रुजविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. इ. वायुनंदन यांनी केले.
नाशिक : ग्रंथ किंवा पुस्तके माणूस घडविण्याचे काम करतात. ग्रंथांमुळे माणसे सुसंस्कृत, प्रगल्भ होतात. देश भौतिकदृष्टया कितीही विकसित असला तरी तो सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून किती विकसित आहे, हे महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे ग्रंथ चळवळ तसेच वाचन संस्कृती आता घराघरात रुजविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. इ. वायुनंदन यांनी केले.
भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाचे राजा राममोहन रॉय पुस्तकालय प्रतिष्ठान आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ग्रंथालय व माहितीस्रोत केंद्राच्या संयुक्त विद्यमाने क्षमता विकास विषयावर राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. पाच दिवस चालणाऱ्या या कार्यशाळेचे कुलगुरू प्रा. इ. वायुनंदन यांच्या हस्ते सोमवारी उदघाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्याचे ग्रंथालय संचालक किरण धांडोरे, कार्यशाळेचे समन्वयक अनिर्बन बिश्वास, कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे आणि ग्रंथालय प्रमुख डॉ. मधुकर शेवाळे उपस्थित होते. कुलगुरू प्रा. वायुनंदन म्हणाले, नव्या पिढीची मानसिकता ओळखून त्यांच्या सोयीने पुस्तके अथवा ग्रंथातील ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवावे लागेल. त्यासाठी आधुनिक माहिती व तंत्रज्ञानाची साधने वापरावी लागतील. असे केल्यास वाचन संस्कृतीचे संवर्धन होण्यास निश्चितच मदत होईल. शिवाय वाचन चळवळीला गतीमानता प्राप्त होईल. समाजाच्या विकासासाठी ग्रंथ हेच गुरु असून वाचनातून जीवन समृद्ध करायला हवे असे सांगून शिक्षणाबरोबरच खेळ, कला, संस्कृती आणि परंपराही जोपासायला हवी असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ग्रंथालय व माहितीस्रोत केंद्राचे प्रमुख डॉ. मधुकर शेवाळे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन श्वेता जाधव यांनी केले.