स्मार्ट सिटी कंपनीच बरखास्त करण्याची गरज : शाहू खैरे
By संजय पाठक | Published: July 20, 2019 11:55 PM2019-07-20T23:55:26+5:302019-07-20T23:57:11+5:30
नाशिक : शहर स्मार्ट करण्यासाठी शासनाने महापालिकेला पर्यायी यंत्रणा उभी केली असली तरी नाशिक स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून चांगले काम होण्याऐवजी वादच उभे राहात आहेत. ज्या नाशिक शहरासाठी ही कंपनी उभी राहिली ती जर योग्य पद्धतीने काम करीत नसेल आणि लोकप्रतिनिधीदेखील अंधारात असतील तर कंपनीचा काय उपयोग? असा प्रश्न करीत महापालिकेतील कॉँग्रेसचे गटनेते आणि स्मार्ट सिटी कंपनीचे संचालक शाहू खैरे यांनी कंपनीच बरखास्त करण्याची मागणी केली आहे.
नाशिक : शहर स्मार्ट करण्यासाठी शासनाने महापालिकेला पर्यायी यंत्रणा उभी केली असली तरी नाशिकस्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून चांगले काम होण्याऐवजी वादच उभे राहात आहेत. ज्या नाशिक शहरासाठी ही कंपनी उभी राहिली ती जर योग्य पद्धतीने काम करीत नसेल आणि लोकप्रतिनिधीदेखील अंधारात असतील तर कंपनीचा काय उपयोग? असा प्रश्न करीत महापालिकेतील कॉँग्रेसचे गटनेते आणि स्मार्ट सिटी कंपनीचे संचालक शाहू खैरे यांनी कंपनीच बरखास्त करण्याची मागणी केली आहे.
प्रश्न : स्मार्ट सिटी कंपनी महापालिकेने स्थापन केली असताना ती बरखास्त करावी ही टोकाची भूमिका घेण्याचे कारण काय?
खैरे : महापालिकेने स्मार्ट सिटी कंपनी स्थापन केल्यानंतर खरे तर सर्वच कामे वेगाने होण्याची गरज होती. परंतु कंपनीचा कारभार अत्यंत वादग्रस्त आहे. कंपनीच्या मार्फत शहरात जेवढी कामे घेण्यात आली त्यातील एक काम धड नाही. महाकवी कालिदास कलामंदिर असो अथवा कलादालन असो स्मार्ट रोडचे रेंगाळालेले काम आणि त्यातील उणिवा या सर्व बघतच आहात. आता त्या स्मार्ट पार्किंगचा नवा मुद्दा उपस्थित झाला आहे. महापालिकेला याबाबत माहिती नाही की नागरिकांना संचालक अंधारात असतात. शेवटी हे सर्व शहरासाठी असेल तर कोट्यवधी रुपये खर्च करून कामे योग्य पद्धतीने होत नसेल तर काय करणार?
प्रश्न : स्मार्ट सिटीच्या नक्की कोणत्या कामांबाबत तक्रार आहे.
खैरे : कंपनीचे संचालक म्हणून यापूर्वी अनेक विषयांवर संचालक मंडळाच्या बैठकीत मुद्दे मांडले आहेत. सर्वच कामे वादग्रस्त आहेत. एक किलोमीटरचा एक रस्ता गेल्या दोन वर्षांत पूर्ण होऊ शकत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यात भुयारी गटारच धरलेले नाही. त्याचा दर्जा योग्य नाही. वेळेत कामही पूर्ण झालेलेले नाही, परंतु ठेकेदारावर काय कारवाई झाली? उलट ठेकेदाराला चार कोटी रुपये वाढीव देण्याचा निर्णय झाला. फुले कलादालनाचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचा काही भाग खाली आला. तरीही आठ महिन्यांपूर्वी हस्तांतरित झालेल्या या कलादालनासाठी आता पन्नास लाख रुपये सुधारित प्राकलन दिले जात आहे. नेहरू उद्यानाचे सुशोभिकरण म्हणजे नक्की काय झाले हे बघून घ्या. गावठाण भागात एक काम झालेले नाही. परंतु स्काडा मीटर खरेदीत कोट्यवधी रुपयांचा घोळ करण्याचा घाट उघड झाला, अशी अनेक कामे आहेत. परंतु त्याबाबत माहिती दिली जात नाही. उडवाउडवीची उत्तरे दिली जातात.