अंधश्रद्धा निर्मूलन आजच्या काळाची गरज : समीर शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 12:53 AM2019-05-26T00:53:43+5:302019-05-26T00:54:02+5:30
वैज्ञानिक दृष्टिकोन अंगी बाळगणे फार महत्त्वाचे आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजेच कार्यकारणभाव तपासणे असा साधा सोपा अर्थ आहे. विज्ञानाने एवढी प्रगती केलेली असली तरी आज जनता अंधश्रद्धेच्या गर्तेत अडकलेली दिसते.
पंचवटी : वैज्ञानिक दृष्टिकोन अंगी बाळगणे फार महत्त्वाचे आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजेच कार्यकारणभाव तपासणे असा साधा सोपा अर्थ आहे. विज्ञानाने एवढी प्रगती केलेली असली तरी आज जनता अंधश्रद्धेच्या गर्तेत अडकलेली दिसते. छोट्या छोट्या गोष्टीत आपण अंधश्रद्धा बाळगतो जनतेने अंधश्रद्धा निर्मूलन करणे ही आजच्या काळाची गरज आहे, असे प्रतिपादन समीर शिंदे यांनी केले.
म्हसरूळ येथील प्रभाग क्र मांक एकच्या वतीने व गुलमोहरनगर ओम गुरु देव हास्य सरिता यांच्या वतीने आयोजित वसंत व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प शिंदे यांनी ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ या विषयावर गुंफले. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, आपण विज्ञानाची करणी घेतली, परंतु विचारसरणी घेतलेली नाही अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ वाढविणे गरजेचे आहे. बुवाबाजी समाजाला लागलेली कीड असून, त्याचे समूळ उच्चाटन होणे आवश्यक आहे. आजही समाजात प्रस्थापित असलेले बुवाबाबा मांत्रिक लोकांचे शारीरिक, मानसिक, आर्थिक शोषण करतात. या सर्वांना आळा घालण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीच्या प्रयत्नाने जादूटोणा विरोधी कायदा अंमलात आला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याने सर्व प्रकारच्या गोष्टींना आळा घालण्यास मदत होणार आहे. सर्व प्रकारच्या अंधश्रद्धा टाळण्यासाठी लोकांनी जीवनमान सुधारले पाहिजे. महाराष्ट्रात संतांच्या विचारसरणीचा वारसा फार महत्त्वाचा आहे, असे ते म्हणाले.
आजचे व्याख्यान
विषय : भारूड
वक्ते: मयुर देशमुख