धर्मनिरपेक्षतेची लढाई लढण्याची गरज - दाभोलकर
By admin | Published: December 23, 2014 10:13 PM2014-12-23T22:13:43+5:302014-12-23T22:14:01+5:30
धर्मनिरपेक्षतेची लढाई लढण्याची गरज - दाभोलकर
मालेगाव : धर्माच्या नावावर अधर्मतेचे खेळ पसरविणारेच सत्तेत येऊ पाहत आहेत. या पार्श्वभूमीवर सामाजिक न्यायाची आणि धर्मनिरपेक्षतेची लढाई लढण्याची गरज असून, सामाजिक अभिसरणासाठी तरुणांनी सज्ज व्हावे, असे आवाहन अंनिसचे डॉ. हमीद दाभोलकर यांनी येथे केले.
प. बा. काकाणीनगर वाचनालयात ग्रंथालय सप्ताहानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत ‘वसा विवेकाचा’ या विषयावर ते बोलत होते. अजय शाह अध्यक्षस्थानी होते. मामको बँकेचे चेअरमन राजेंद्र भोसले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
दाभोलकर म्हणाले, विवेककारण हीच या देशाच्या भावी सुदृढ समाजाची पायाभरणी असून, धार्मिक अतिरेक, भ्रष्टाचार, जाती, धर्मभेद यांचे मूळ मानवाच्या अविवेकात आहे. आज विवेकवादाची गरज आहे. त्यामुळे धर्माची विधायक आणि कृतिशील चिकित्सा करावी लागेल. धर्माची राजकीय दुकानदारी सुरू राहावी म्हणून काही धर्ममार्तंडांनी कर्मकांड आणि देवाला लाच देण्याच्या प्रतिमेमध्ये समाजाला अडकवून ठेवले आहे. धर्माची विवेकवादी चिकित्सा हीच विज्ञानाची खरी जननी आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जादूटोणाविरोधी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी अठरा वर्षे झगडून डॉ. नरेंद्र दाभोलकरांना बलिदान द्यावे लागले. यातून शासनाचा नाकर्तेपणा सिद्ध होतो. सामाजिक, राजकीय बदलाच्या पार्श्वभूमीवर अंधश्रद्धा निर्मूलन समिती पंचवीस वर्षांपासून व्यापकरीत्या कार्य करत आहे. जादूटोणाविरोधी कायदा संमत होऊन एकच वर्षात सव्वाशे गुन्ह्यांची नोंद झाली आहे व यातच अंनिसचे यश आहे, असेही दाभोलकर यावेळी म्हणाले. प्रारंभी रविराज सोनार यांनी डॉ. दाभोलकर यांचा परिचय करून दिला. (प्रतिनिधी)